देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चा होताना दिसत आहे. आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे त्यांनी सोशल मीडियापासून राजकीय पक्षांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पक्षाची वाटचाल हिंदुत्वाच्या वाटेवर सुरु केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यामुळे राज्यासह देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. असं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी दिली आहे. त्यावर आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“धमकी कुणी दिली याचं काही महत्त्व आहे की नाही? अशा धमक्यांना मनसे, महाराष्ट्र सैनिक आणि स्वत: राज ठाकरे भीक घालत नाहीत. राज ठाकरेंबद्दल बोललो की प्रसिद्धी मिळते. त्यांना ती प्रसिद्धी मिळाली आहे. पण हे झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेलेला आहे आणि गप्प बसा सांगितलं आहे.” असं मनसे नेते अभिजीत पानसे यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले होते ब्रिजभूषण सिंह?
“महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले आहेत. मराठ्यांनी देशासाठी पानिपतपर्यंत येऊन युद्ध केलंय. हा महाराष्ट्राचा एक अभिमानास्पद इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे त्यांचे विश्वासाचे लोक होते. मात्र, त्याच शिवाजी महाराजांच्या भूमीवर राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मतो. हा व्यक्ती मराठी माणूस आणि उत्तर भारतीय असा मुद्दा निर्माण करतो. राज ठाकरे यांनी स्वस्तातील प्रसिद्धीसाठी टॅक्सीवाले, विद्यार्थी यांना मारहाण केली. चित्रपट क्षेत्रातील लोकांना शिवीगाळ केली. राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर यूपी, बिहार, झारखंडच्या लोकांना शिवीगाळ करतात. राज ठाकरेंनी २००७ पासून २०२०-२१ पर्यंत योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आज त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झालंय. ते आज अयोध्येला येत आहेत. राज ठाकरे यांनी अयोध्येत यावं मात्र, आधी त्यांनी जे चुकीचं काम केलं, जे विष कालवून फूट पाडण्याचं काम केलं त्यासाठी माफी मागावी. यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. माझ्याकडे त्यांची नावं आहेत. गरज लागल्यास ती यादी मी देईल. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर येण्याआधी उत्तर भारतीयांसोबत जे केलं त्यासाठी खेद व्यक्त करा, माफी मागावी आणि अयोध्येत यावं”