अहमदनगरच्या फकीरवाडा भागात रविवारी (०३ जून) संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. तसेच या मिरवणुकीत त्यांनी घोषणाबाजी केल्याचाही आरोप केला जात आहे. याप्रकरणी भिंगार कँप पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. त्यापाठोपाठ कोल्हापुरातही मोठा राडा झाला आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद आहेत. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं. यादरम्यान जमाव प्रक्षुब्ध झाला, परिणामी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. या प्रकरणावर आता मनसेकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ज्या लोकांचं औरंगजेबावर प्रेम आहे त्यांच्या पार्श्वभागावार लाथा घाालायला पाहिजेत. औरंगजेबाला जिथे पुरलं आहे (दफन केलं आहे), तिथे यांनाही पुरायला हवं. तसेच ज्या लोकांनी सोशल मीडिया स्टेटस ठेवलं होतं, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. आंदोलकांवर लाठीचार्ज कसला करता. हिंदूंकडून अशी प्रतिक्रिया येणं सहाजिक आहे. देशपांडे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा >> “तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…”, मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातल्या घटनेवरून अमित ठाकरेंचा संताप; म्हणाले…
संदीप देशपांडे म्हणाले, ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले, त्यातही राष्ट्रवादीच्या जितुद्दीनला (काही हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख जितुद्दीन असा करतात.) मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांचं लांगुलचालन करायचं आहे. त्यासाठी हे सगळे धंदे चालले आहेत. देशपांडे म्हणाले, मुळात सरकारसह जनतेत कोणालाही दंगली नको आहेत. परंतु या असल्या घाणेरड्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही.