मुंबईच्या एका गुजरातीबहुल सोसायटीमध्ये काही गुजराती रहिवाशांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा प्रचार करण्यापासून कार्यकर्त्यांना रोखलं, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या या आरोपानंतर मुंबईत मराठी-गुजराती वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आता मनसेनेही प्रतिक्रिया दिली असून मुंबईत जाणीवपूर्वक मराठी गुजराती वाद निर्माण केला जात असल्याची आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?
संदीप देशपांडे यांनी आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. “ईशान्य मुंबईत निवडणूक सुरू आहे. त्यामुळे मराठी-गुजराती वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हा प्रयत्न ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – राज ठाकरे यांचा विनायक राऊतांना टोला; म्हणाले, “नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की…”
“ठाकरे गटाचे नेते म्हणत आहेत, त्यांना गुजराती लोक सोसायटीच्या आत येऊ देत नाहीत. पण काही दिवसांपूर्वीच मुंबईत ठाकरे गटानेच गुजराती समाजाचे मेळावे घेतले होते. वरळीत ‘केम छो वरळी’ असे होर्डींगही ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते. तेव्हा त्यांना गुजराती लोकांचा पुळका होता. मात्र, आता त्यांना निवडणुकीसाठी मराठी माणसांची मते हवी आहेत. त्यामुळे गुजराती मराठी वाद निर्माण केला जातो आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. “उद्धव ठाकरे आज भोळेपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या भोळ्या चेहऱ्याच्या मागे कपटी माणूस आहे आणि हे जनतेला माहिती आहे”, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा – अडचणीच्या काळात राज ठाकरेंकडे येणारे लोक मतं का देत नाहीत? म्हणाले, “हल्ली लोकांना…”
गिरगावमधील प्रकरणावर दिली प्रतिक्रिया
दरम्यान, रविवारी एका कंपनीने ग्राफिक डिझायनर्सच्या जागेसाठी जाहिरात देताना त्यात मराठी मुलांनी अर्ज करू नये अट घातली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भातही संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणातील मुलीला आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तिचा फोन बंद होता. मात्र, ती जाहिरात देणाऱ्यांना आता जनतेने धडा शिकवला आहे. हे यश मनसेचे आहे. मनसेने मराठी माणसांना आत्मविश्वास दिला आहे. त्यामुळे आम्हाला मैदानात उतरायचीदेखील गरज नाही”, असे ते म्हणाले.