सोमवारी रात्रीपासूनच शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. भाजपासोबत सरकार स्थापन करावं, अशी अट एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घातल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना सूरतला एकनाथ शिंदेंशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. त्यात आता भाजपासोबतच मनसेकडून देखील शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

नेमकं झालंय काय?

एकनाथ शिंदे सकाळपासूनच नॉट रीचेबल असल्याचं समोर आल्यानंतर राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलं. सोमवारी लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मतं फुटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळू लागले होते. त्यात आज सकाळपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रीचेबल झाल्यामुळे राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

“सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार का?” पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया; होकारही नाही आणि…

दरम्यान, याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून खोचक टोला लगावला आहे. “२१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?” अशा शब्दांत मनसेनं थेट उद्धव ठाकरेंवरच खोचक टोला लगावला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर आपल्याच मंत्र्याकडून मोठं संकट ओढवलेलं असताना दुसरीकडे यानिमित्ताने विरोधकांच्या हाती मात्र आयतंच कोलीत मिळाल्याचं दिसून येत आहे.

Story img Loader