राज्यात एकीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार, याची उत्सुकता असताना दुसरीकडे दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगू लागलं आहे. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर देखील हक्क सांगणाऱ्या शिंदे गटाकडून आता दसरा मेळावा आमचाच होणार, असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेकडून देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आमचाच होणार अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, या दोघांवर टीका करत मनसेकडून मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मनसेकडून शिवसेना आणि शिंदे गट या दोघांना खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसरा मेळाव्याचं राजकारण…

यंदाचा दसरा मेळावा नेमका कुणाचा होणार? यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुखांचं होणारं भाषण हे समीकरण ठरलेलं आहे. या भाषणात पक्षप्रमुख पक्षाची राजकीय भूमिका मांडतानाच आगामी वाटचालीबाबत देखील संकेत देत असतात. यंदा मात्र नेमकी शिवसेना कोणती? हाच प्रश्न उपस्थित केला जात असताना दसरा मेळावा कोण घेणार? आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषण कोण करणार? या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मनसेकडून सातत्याने बाळासाहेबांचा विचार आमच्यासोबत असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणादरम्यान “माझ्याकडे चिन्ह असलं किंवा नसलं, नाव असलं किंवा नसलं, त्याने फरक पडत नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे”, असं म्हटलं होतं.

यंदा दसरा मेळावा शिवसेनेचा नसून शिंदे गटाचाच होणार? नरेश म्हस्केंचं मोठं विधान; म्हणाले, “कळेल तुम्हाला, मुख्यमंत्री…!”

“आमची अशी इच्छा आहे की दसरा मेळाव्याला राज ठाकरेंनी…!”

यानंतर आता मनसेकडून ही भूमिका सातत्याने मांडली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये याच मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांना लक्ष्य केलं आहे. “‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. मात्र, यासोबतच यंदाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषण करावं, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडली आहे.

या ट्वीटसोबत त्यांनी राज ठाकरेंचा एक फोटो शेअर करत त्यावर “वारसा हा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो” हे त्यांचं वाक्य देखील लिहिलं आहे.