गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादावर निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री उशीरा एक हंगामी आदेश जारी केला. यानुसार शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे हंगामी निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय, शिवसेना हे नावही गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात असला, तरी पक्षाकडून खंबीरपणे लढा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी शिवसेनेनं केल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशावरून मनसेनं उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांमध्ये टीकास्र सोडलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा निर्णय आल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी संस्कृतमधील एक वाक्य शेअर करत शिवसेनेला टोला लगावला. “संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नम:” असं या ट्वीटमध्ये देशपांडे म्हणाले आहेत.
या ट्वीटनंतर आज सकाळी त्यांनी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासमोर केलेल्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप ट्वीट केली. यामध्ये “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, नाव असलं काय नसलं काय. मला फरक पडत नाही. कारण माझ्याकडे विचार आहेत”, असं म्हणताना राज ठाकरे दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘वारसा वस्तूचा नसतो, विचारांचा असतो’ असं म्हटलं आहे.
शिवसेना पक्षनावासह चिन्हही गोठवले; केंद्रीय निवडणूक आयोगाचा हंगामी निर्णय, उद्धव ठाकरे गटाला धक्का
यानंतर लागलीच देशपांडे यांनी एक ट्वीट करत थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, ज्याला इंग्रजीमध्ये Victim Card असं म्हणतात. जे यापुढे सातत्याने बघायला मिळेल’, असं या ट्वीटमध्ये संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय हंगामी असला, तरी त्याचा फटका आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शिंदेगट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव लावता येणार नाही.