मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज महाराष्ट्रात आणि हैदराबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. मात्र, नऊ वाजता हैदराबादमध्ये अमित शाह यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी नऊ वाजता होणारा कार्यक्रम सात वाजताच आटोपल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे. मात्र, यासोबतच आज प्रबोधनकार ठाकरे यांचीही जयंती असून त्यानिमित्ताने एकीकडे राज ठाकरेंनी केलेली पोस्ट व्हायरल होत असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून झालेलं एक ट्वीटही व्हायरल होऊ लागलं आहे. हे ट्वीट नंतर डिलीट करण्यात आलं असलं, तरीही त्याचे स्क्रीनशॉट शेअर करत मनसेनं सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं आहे.
राज ठाकरेंची पोस्ट!
प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंची आज जयंती. माझ्या आजोबांचा धर्म या कल्पनेला विरोध नव्हता. उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावावर चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रुचायची नाही. असली भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत. आख्खं आयुष्य त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भिती काढून धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावं, यासाठी वेचलं”, असं आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत.
या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी एक क्यूआर कोड शेअर केला असून त्यात प्रबोधनकार ठाकरेंचं एक भाषण त्यांनी ऐकायचा सल्ला दिला आहे. “प्रबोधनकार ठाकरेंनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका असं आवाहन केलं आहे. हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका, याची आठवणही त्यांनी भाषणात करून दिली आहे. रझाकारी औलादी डोकं वर काढत आहेत. अनेक ठिकाणी आया-बहिणींची छेड काढत आहेत. भाषणात आमच्या आजोबांनी म्हटलं त्याप्रमाणे अशा लोकांच्या गालावर वळ उठवा. हे करताना मी या पक्षाचा, त्या पक्षाचा असला विचार करायची गरज नाही. कदाचित तुमचे नेते कच खातील, पण तुम्ही खाऊ नका. प्रबोधनकारांना अभिवादन करताना एक निर्धार प्रत्येकानं केला पाहिजे. जिथे कुठे अन्याय दिसेल, तिथे पेटून उठायचं आणि अन्यायाचा फडशा पाडायचा. हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल”, असंही राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंची ही पोस्ट व्हायरल होताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरेंना जयंतीनिमित्ताने अभिवादन करताना केलेल्या ट्वीटचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. हे ट्वीट नंतर डिलीट करण्यात आलं. मात्र, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत सु्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
काय आहे या ट्वीटमध्ये?
या ट्वीटमध्ये संदीप देशपांडेंनी सुप्रिया सुळेंच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. “सत्यशोधक विचारांचा वसा घेऊन त्यासाठी आयुष्यभर लढा देणारे प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन”, असा संदेश या ट्वीटमध्ये लिहिण्यात आला होता. यावरून संदीप देशपांडेंनी खोचक ट्वीट केलं आहे.
“प्रबोधनकार ठाकरेंना के. सी. ठाकरे म्हणण्याएवढ्या तुम्ही मोठ्या झाला नाहीत ताई”, असं या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये “एस. जी. पवार साहेबांच्या सांगण्यावरून ट्वीट डिलीट केलंत का ताई?” असाही खोचक सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे.