मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या एक मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आधीच सोभेवरून राजकीय वाद सुरू झाला आहे. राज ठाकरे सभेमध्ये कोणती भूमिका मांडणार? यावरून चर्चा सुरू असतानाच त्यांच्या सभेला भीम आर्मीने आक्षेप घेतला आहे. त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत उत्तर प्रदेश सरकारने राबवलेल्या निर्णयावर देखील राज ठाकरेंनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना सुरुवात झालेली असताना मनसेकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.

राज ठाकरेंचं ‘ते’ ट्वीट!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून गुरुवारी सकाळी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असं आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय चर्चा सुरू झालेली असतानाच त्यावर खुलासा करताना मनसेकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “धार्मित तेढ कुणाकडून निर्माण होते? राज ठाकरे म्हणतात की जो न्यायालयाचा आदेश आहे, त्याचं पालन सरकारने करायला हवं. न्यायालयाच्या आदेशाचं पालनं करायला पाहिजे म्हणणारे लोक धार्मिक तेढ कसे निर्माण करतात, हे सरकारने स्पष्ट करायला हवं”, असं संदीप देशपांडे म्हणाले.”जे लोक म्हणतायत की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणार नाही, डेसिबलचं पालन करणार नाही, त्या लोकांना सांगायला हवं की धार्मिक तेढ निर्माण करू नका. आम्ही नियमांचं पालन करतोय. जे पालन करणार नाही, त्यांना शिकवण्याची गरज आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस देण्याची गरज आहे”, असं देखील ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला!

दरम्यान, यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगामी सभेवर टोला लगावला. लवकरच सभा घेऊन राजकीय विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. यावर बोलताना, “बघू मुख्यमंत्री काय बोलतायत ते. त्यांचं फेसबुक लाईव्ह ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो आहोत. आता मुख्यमंत्री करोना सोडून काहीतरी बोलतायत याचा आनंद आहे”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी टोला लगावला.

“योगी आदित्यनाथ यांनी काम केलं, भोंग्याचा विषय मार्गी लावला. कौतुक कार्यसम्राटांचं होतं, फेसबुकवर टोमणे मारणाऱ्या टोमणेसम्राटांचं होत नाही”, असा टोला देखील त्यांनी लगावला.

सभेला परवानगी मिळणार?

सभेसाठी परवानगी कशी मिळवायची, ते आम्हाला माहिती आहे, असं म्हणत सभेला परवानगी मिळणार असल्याचं देशपांडेंनी ठामपणे सांगितलं. “मनसेच्या स्थापनेला १६ वर्ष झाली. यात राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या आहेत. कोणत्याही सरकारने आम्हाला सरळ मार्गाने सभा घेऊ दिली नाही. त्यामुळे सभेची परवानगी कशी घ्यायची, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही अनुभवातून शिकलो आहोत”, असं ते म्हणाले.