महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठवड्यात धमकीसत्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोनवरून धमकी देण्यात आली. संजय राऊत यांनी याप्रकरणी माध्यमांना माहिती दिली. त्यानंतर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनाही फोनवरून धमकावल्याची माहिती राऊत यांनी दिली. याप्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंगही समोर आलं होतं. आता या प्रकरणात पोलिसांनी मयुर शिंदे नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. परंतु हा मयुर शिंदे संजय राऊतांचा निकटवर्तीय असून राऊतांच्याच सांगण्यावरून त्याने हे धमकीचं नाटक केलं असल्याचा दावा मनसे आणि भारतीय जनता पार्टीने केला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हा एक नंबरचा बोगस माणूस आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं आहे. किती खोटं बोलायचं एखाद्या माणसाने, आपण किती खोटारडे आहोत हे राऊत यांनी सिद्ध केलं आहे. केवळ पोलीस संरक्षण मिळावं, आपला लवाजमा वाढावा यासाठी किती नाटकं करावीत याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत. म्हणजे तुम्ही (राऊत) तुमच्याच माणसाला सांगताय की, मला धमकीचे फोन कर. तो माणूस फोन करून शिव्या घालण्याचं नाटक करतोय. त्याला सुनील राऊत शिव्या घालून उत्तर देत आहेत. किती ती नाटकं. या संजय राऊतांनी राजकारण सोडून नाटकात कामं केली तर मोठं नाव कमावतील. रोज सकाळी ते जो हंगामा करत आहेत ते बंद होईल. मुळात यांचे गँगस्टर (माफिया/डॉन) लोकांशी कशा पद्धतीचे संबंध आहेत ते यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, माझ्यावर जो हल्ला झाला होता, त्यात एका नवीन आरोपीचं नाव समोर आलं आहे. निलेश पराडकर असं या आरोपीचं नाव आहे. तो सध्या गायब आहे. तो निलेश पराडकरसुद्धा संजय राऊत आणि सुनील राऊतांच्या जवळचा माणूस आहे. लोकाना मारण्याचा सुपाऱ्या देण्याचं काम संजय राऊत करत आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अशा माणसांनी राजकारणात राहू नये. लोकांनी यांच्या पार्श्वभागावर लाथा मारून हाकलून दिलं पाहिजे.
देशपांडे म्हणाले, हा मयुर शिंदे शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे. तो एक गँगस्टर आहे. त्याचे संजय आणि सुनील राऊतांबरोबरचे अनेक फोटो आहेत. हा कोण आहे हे सांगायची गरज नाही, कारण हे सगळं दिसतंच आहे. आता न घाबरता आणि न थुकंता यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं पाहिजे. नाहीतर लोक आता त्यांच्यावर थुंकतील. या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला तोंड कसं दाखवायचं, रोज सकाळी तोंड दाखवायचं का असा प्रश्न त्यांना पडला असेल. त्याचबरोबर अशा खोटारड्या माणसाला आपण टीव्हीवर लाईव्ह दाखवायचं का याचा विचार तुम्हीसुद्धा (वृत्तवाहिन्यांनी) केला पाहिजे.