गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगळंच फोटोवॉर दिसून येऊ लागलं आहे. सर्वात आधी मनसेकडून शरद पवार, बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे यांचा एका कार्यक्रमातला फोटो शेअर करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा एक जुना फोटो ट्वीट करत मनसेला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावरून राजकीय धुरळा अद्याप खाली बसलेला नसताना मनसेनं पुन्हा एकदा शरद पवारांचा एक जुना फोटो ट्वीट करत “आता ही बैठक कधी झाली?” असा खोचक सवाल केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून सुरू झालेले राजकारण आता हळूहळू वेगळ्याच ‘फोटोवॉर’मध्ये रुपांतरीत होऊ लागलं आहे.

सचिन मोरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकला काही दिवसांपूर्वी काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं होतं. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. हे फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावरून शरद पवारांनीच बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंच्या विरोधात रसद पुरवल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर

दरम्यान, या फोटोंना प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिसत आहेत. या फोटोमध्ये राज ठाकरे शरद पवारांना हातात हात देत एका कार्यक्रमातल्या स्टेजवर चढण्यासाठी मदत करत असल्याचं दिसून येत आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मिटकरींनी ट्वीटमध्ये म्हटलेलं नाही.

फोटोचं उत्तर फोटोने! अमोल मिटकरींचं मनसेला ‘हा’ फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर! बृजभूषण सिंहांसोबत पवारांचे फोटो झाले होते व्हायरल!

संदीप देशपांडेनी ट्वीट केला अजून एक फोटो!

फोटोंवरून राजकारण तापू लागलेलं असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक जुना फोटो ट्वीट केला आहे. या फोटोसोबत “आता ही बैठक कधी झाली? आणि अशा किती बैठका झाल्या…सापळा!” अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.

“आप जैसा कोई, मेरी जिंदगी मे आए”

त्यासोबतच, “आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये, तो बात बन जाए” अशी देखील कॅप्शन दिली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात फोटोंवरून राजकारण सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Story img Loader