मुंबईत झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवर भाष्य करताना शिंदे गटालाही लक्ष्य केलं. “सगळे मिंधे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून हातात तलवार घेऊन आघाडीवर लढत आहेत”, असं उद्धव ठाकरे या भाषणात म्हणाले. यासंदर्भात बोलताना आता मनसेनं उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा समाचार घेतला. तसेच, याआधीही उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा उल्लेख ‘मुन्नाभाई’ असा केल्याचा संदर्भदेखील संदीप देशपांडेंनी यावेळी दिला.
“कमजोर मुलावर आई-वडिलांचं जास्त प्रेम”
“जो कमजोर मुलगा असतो, त्याच्यावर आई-वडिलांचं प्रेम जास्त असतं. जो कर्तृत्ववान मुलगा असतो, त्याच्याबद्दल त्यांना माहिती असतं की हा त्याचं त्याचं काम करेल, खाईल, घर घेईल. पण कमजोर मुलावर आई-वडिलांचं प्रेम जास्त असतं. त्यामुळे त्याला ते घरही देतात, सगळं देतात. कारण त्याच्यात कर्तृत्व नसतं”, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.
“यांना काय उत्तर देणार?”
“बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं आहेत. मग यांना काय उत्तर द्यायचं? यांचं स्वत:चं कर्तृत्व शून्य आहे. म्हणून मग कुणाला मिंधे, कुणाला मुन्नाभाई, कुणाला आणखीन काय म्हणत राहायचं”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी टीका केली.
फक्त टोमणे मारणं याच्याव्यतिरिक्त यांचं कोणतंही कर्तृत्व नाही. यांचं कर्तृत्व गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रानं पाहिलं आहे. करोना काळात लोकांचे हाल होत असताना हे घरात बसले होते. काल संजय राऊतांची खुर्ची रिकामी ठेवली होती. अडीच वर्षांत मंत्रालयातली स्वत:चीही खुर्ची यांनी रिकामी ठेवली. तिथेही कधी पोहोचले नाही. त्यामुळे ज्यांना दुसऱ्याच्या पुण्याईवर बोलण्याची सवय झाली आहे, त्यांनी राज ठाकरेंवर बोलण्याची गरज नाही, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी ट्वीटमधूनही संजय राऊतांचं नाव घेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती. उद्या तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल. तयारी ठेवा”, असं आपल्या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
मुंबईत झालेल्या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर संजय राऊतांसाठीची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्यावरून मनसेनं टोला लगावला आहे.