मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये आमदारांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरं देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या निर्णयावरून आता राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामान्य जनतेमधून मात्र आधीच कोट्याधीश असणाऱ्या आमदारांना पुन्हा मोफत घरे कशासाठी? असा सवाल देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं या निर्णयाचा समाचार घेताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून?”

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून केला जात आहे, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. “मुळात हे कशासाठी हवंय? आमदार निवास उपलब्ध आहे. निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत येतात तेव्हा राहण्याची सोय होते. मग ही मोफत घरं कशासाठी? राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत. वीज कापणी जोरात सुरू आहे. एसटी कर्मचारी पगार होत नाहीत म्हणून संपावर आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था आहे. पैसे नाहीत म्हणू नोकरभरती होत नाही. मग हा अवाढव्य खर्च नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

“सरकार डळमळीत होतंय म्हणून…”

दरम्यान, सरकार वाचवण्यासाठीच ही सगळी धडपड सुरू असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. “नेमकं सरकारला साध्य काय करायचंय? की तुमचं सरकार डळमळीत होतंय, म्हणून आमदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे? मुळात या प्रकाराची गरज काय? जनतेच्या पैशाच्या जीवावर मजा लुटणारे तुम्ही कोण? यासाठी सरकारने सार्वमत घेऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्यानंतरच यावर निर्णय घ्यावा. जनता सूज्ञ आहे. जनता नक्कीच याला विरोध करेल”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sandeep deshpande targets cm uddhav thackeray free flats for 300 mlas pmw