धुळवडीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, या वातावरणात राजकीय मंडळी देखील राजकीय टोले-प्रतिटोल्यांची धुळवड खेळण्यात दंग झाली आहेत. एकीकडे निवडणुकांच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शरद पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये अशीच राजकीय धुळवड रंगण्याची शक्यता आहे. मनसेनं सुरुवातीपासूनच मुंबईत शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. आज धुळवडीच्या निमित्ताने मनसेकडून उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावण्यात आला आहे.
“बुरा ना मानो…”
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरेंच्या एका भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला असून त्यावर “बुरा ना मानो, होली है” अशी कॅप्शन देखील लिहिली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मनसेनं उद्धव ठाकरेंना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिल्याचं बोललं जात आहे. तसेच, राज्यात शेतकऱ्यांच्या वीजतोडणीचा मुद्दा तापलेला असताना मनसेनं उद्धव ठाकरेंचं जुनं आश्वासनच पुन्हा ऐकवल्याचं देखील बोललं जात आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रचारसभेत व्यासपीठावरून भाषण करताना दिसत आहेत. हा जुना व्हिडीओ वाटत असला, तरी नेमका कधीचा किंवा कोणत्या निवडणुकांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे, याविषयी निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. एका वृत्तवाहिनीचा हा व्हिडीओ असून त्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना एक विशिष्ट उपकरण देण्याचं आश्वासन देताना दिसत आहेत.
“युवराजांनी हा सगळा पुढाकार…”; IPL ची बस फोडल्यानंतर मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
“विजेशिवाय तुमचा कृषीपंप चालेल”
“अनेक ठिकाणी विहिरीला पाणी असतं, पण वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी पिकाला देऊ शकत नाहीत. मला सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवलं आहे. वीज तर देईनच. पण जोपर्यंत वीज देता येणार नाही, तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईन. ते उपकरण तुमच्या बैलाच्या सहाय्याने चालेल. त्यातून जी वीज निर्माण होईल ती या विजेच्या शिवाय तुमचा कृषीपंप चालवू शकेल. वीज नसताना देखील तुम्ही तुमच्या पिकाला त्या पंपाच्या माध्यमातून पाणी देऊ शकाल”, असं उद्धव ठाकरे या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.
थकीत वीजबिलांच्या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याचा मुद्दा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील विरोधकांनी उचलून धरला होता. अखेर, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजतोडणी स्थगित करत असल्याची घोषणा केली.