Sandeep Deshpande Letter to Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मागील दोन दिवसांत भाजपा-शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना एक पत्र लिहिले आहे. पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी योगा करावा, असा सल्ला त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस एका गुंडाची…”, ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया!
नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?
“तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चीडचीड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चीडचीड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
राऊतांना दिला ‘हा’ सल्ला
पुढे त्यांनी संजय राऊतांना सल्लाही दिला आहे. “आपण रोज जी पत्रकार परिषद घेता, त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का? ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्र्यांना एक फोन केला आणि सर्व मागण्या…’, पुण्यात शरद पवार आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला
“शिवसेनेच्या ऱ्हासाला उद्धव ठाकरे जबाबदार”
सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली, ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
“पटलं तर घ्या, नाही तर…”
कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या, नाही पटलं तर चु%^* आहे असं म्हणून विसरून जा, असे ते म्हणाले.