उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सात टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेनेने देखील उमेदवार उभे केले असून संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी गोरखपूरमधल्या काही मतदारसंघांमध्ये गुरुवारी प्रचारसभा घेतल्या. उत्तर प्रदेशातल्या हिंदी भाषिक मतदारांसमोर शिवसेना उमेदवार मतांसाठी प्रचार करत असल्यामुळे त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून मनसेनं या प्रचारासंदर्भात एक खोचक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशच्या डुंबारियागंजमध्ये प्रचारसभा घेताना केलेल्या भाषणात मुंबई आणि महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांचा उल्लेख केला होता. याचसंदर्भात आता मनसेनं टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊतांनी आपल्या भाषणात अर्धी मुंबई हिंदी बोलते, असं विधान केलं होतं. “आम्ही जेव्हा मुंबईत फिरतो, मुंबईपासून पुण्यापर्यंत कुठेही जातो, तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. मुंबईत म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते. त्यातही जिथे आम्ही जातो, तिथे १० पैकी ६ लोक सिद्धार्थनगरचे असतात. हे आमचं नातं आहे उत्तर प्रदेशशी”, असं राऊत म्हणाले होते.
यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर संजय राऊतांचं नाव न घेता टोला लगावला आहे. “अर्धी मुंबई हिंदी बोलते असा जावई शोध लावण्याऱ्यांना ‘भैय्या भूषण’ पुरस्कार द्यायला पाहिजे”, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर देखील संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या कामगिरीवर सर्वच पक्षांचं लक्ष लागलं आहे.