राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून पक्षातच नाराजीनाट्य सुरु असल्याचं दिसत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त आधी त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावावा असं जाहीर आव्हान दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला आता मनसेने उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते सुजात आंबेडकर –
“सध्या रमजानचे दिवस आहेत. काल कोणीतरी एक वक्तव्य केलं की मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालिसा म्हणायला लावेल. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा,” असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं होतं.
“हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं”
“मला तिकडे एकही बहुजन पोरगा नको आहे. जितकी लोकं हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं, मग हनुमान चालिसा म्हणा,” असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलं होतं.
“स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण…”
सुजात आंबेडकर पुढे म्हणाले होते की, “राज ठाकरे यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही शरद पवार यांची मुलाखत घ्या, तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम दंगलींवर उभा करू नका.”
शालिनी ठाकरेंचं उत्तर –
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत सुजात आंबेडकरांचा टीकेला उत्तर दिलं आहे. “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. “सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितलं आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?,” अशी विचारणा शालिनी ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा.”
“अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, तिथेही प्रार्थना केल्या जातात, पण जाहीरपणे भोंगे बसवल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का, कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगितलं गेलंय. यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.