देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दहाव्यांदा भाषण करताना देशाच्या विकासासंदर्भात भाष्य केलं. तसेच, घराणेशाही, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली. मात्र, त्याचवेळी मनसेकडून अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. देशाच्या प्रगतीसंदर्भात राज ठाकरे या व्हिडीओमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.
काय आहे हा व्हिडीओ?
हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याविषयी मनसेच्या ट्वीटमध्ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, राज ठाकरेंच्या एका मुलाखतीमधला हा व्हिडीओ आहे. त्यातील संदर्भानुसार तो दोन वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता आहे. या व्हिडीओबरोबर मनसेनं ट्वीटमध्ये “खरंच आपण प्रगती केली आहे का?” असा प्रश्न केला आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत मनसेनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणतायत राज ठाकरे?
या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी देशाच्या प्रगतीच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “आपल्या देशात प्रगतीच्या नक्की व्याख्या काय आहेत? आपण ५० वर्षांपूर्वी जे बोलत होतो, तेच आजही बोलतोय. आजही आपल्या निवडणुकांमध्ये आपले विषय बदललेले नाहीत. आजही आपण सांगतो की आम्ही तुम्हाला चांगले रस्ते, चांगलं पाणी, वीज, शिक्षण देऊ. ७५ वर्षांत जर आपण त्याच विषयांवर निवडणुका लढवत असू, तर आपण प्रगती नेमकी कोणत्या बाजूने केली हेही पाहाणं गरजेचं आहे”, असा मुद्दा राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये उपस्थित केला आहे.
“आपण मूळ विषयाकडे कधी वळलोच नाही. देशाच्या लोकसंख्येवर आपण जोपर्यंत विचार करत नाही, तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. ७५ वर्षांत जर तुम्हाला टाऊन प्लॅनिंग करता येत नसेल, तर कसं होणार? ७५ वर्षांत असा सर्वांगीण विचार जर होत नसेल तर मला खरंच प्रश्न पडतो की प्रगती ही व्याख्या नेमकी कशात बसवायची. मला अजूनही समजत नाही की नेमकी प्रगतीची व्याख्या कशी करायची?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंनी आज सकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवर मनसेकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.