MNS Shares NCP & Brij Bhushan Singh Photos: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप केला आहे. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं सांगताना हा आरोप केला होता. यानंतर राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच आता मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून मनसेने अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधत रसद पुरवल्याचा आरोप केला आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याआधी शऱद पवारांनीच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे.

अयोध्या दौऱ्याविरोधात राज्यातूनच रसद : राज ठाकरे

राज ठाकरेंचे सचिव सचिन मोरे यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है” असं म्हटलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

“अयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली. त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागील भूमिका रविवारी स्पष्ट केली होती.

अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो. मात्र राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने तिकडे जायचे ठरविले असते तर माझ्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक हिंदू बांधव आले असते. तेथे जर काही झाले असते तर कार्यकर्ते भिडले असते. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असते. त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला असता. ससेमिरा मागे लावण्यात आला असता. हा सर्व संभाव्य प्रकार लक्षात आल्याने मी दौरा रद्द केला, असे स्पष्टीकरण राज यांनी दिले.

मनसेने काय म्हटलं आहे –

मनसे नेते गजानन काळे यांनी या फोटोबद्दल एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “सुज्ञास अधिक सांगण्याची गरज नाही. शरद पवारांबद्दल दिल्लीत घडलेली दुर्दैवी घटना किंवा केतकी चितळे प्रकरण असो राज ठाकरेंनी सर्व मतभेद, मनभेद बाजूला ठेवून समोर आले होते. दक्षिण भारतातही सर्व नेते एकत्र येतात. पण महाराष्ट्रात चुकीचे पायंडे पडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. या फोटोतून नेमकं आम्हाला कुठे बोट ठेवायचं आहे आणि काय म्हणायचं आहे हे समजेल”. मावळमध्ये झालेल्या २०१८ च्या कार्यक्रमातील हा फोटो असून सुप्रिया सुळेंच्या फेसबुक पेजवर आहे अशी माहिती यावेळी गजानन काळे यांनी दिली.

राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया –

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर बोलताना म्हटलं की, “बालिशपणा म्हणायचं की पोरकटपणा म्हणायचं मला कळत नाही. आम्ही कुठेच राज ठाकरेंबद्दल वक्तव्य केलं नाही. सर्व सभांमध्ये त्यांनी शरद पवारांविरोधात वक्तव्य केलं. त्यांच्याकडून महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिन्ही भाषणं पाहिली तर आपल्याबद्दल, पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल न बोलता राष्ट्रवादीने, शरद पवारांनी काय केलं याबद्दल बोलत होते”.

“राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. ते भाजपाचे खासदार आहेत, राष्ट्रवादीचे नाही. राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात स्तुतीसुमनं उधळली असताना ते मात्र यावर एक शब्द बोलले नाहीत. मुख्यमंत्री असताना राज्यात येणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा ते देऊ शकत होते. स्वत:च्या पक्षाच्या खासदाराला ते आवरु शकले नाही. गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आम्ही सुरक्षा देऊ, सुखरुप नेऊ असा एकही शब्द काढला नाही,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

महाराष्ट्रात फडणवीस, दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थीदेखील केली नाही असंही यावेळी ते म्हणाले. “राज ठाकरेंनी नवहिंदुत्ववादी नेता म्हणून आपल्याला समोर आणलं तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भाजपाने गनिमी कावा केला,” असा थेट आरोप महेश तपासे यांनी यावेळी केला.

मनसे नेते गजानन काळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करु नये असं जाहीर सांगावं असं आव्हान दिलं. यावर महेश तपासे आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगत असून याचा अर्थ तुम्ही पत्रकार परिषद ऐकली नाही असा टोला लगावला.

Story img Loader