गेल्या दोन दिवसांपासून बाबरी मशीद आणि त्याअनुषंगाने घडलेल्या घडामोडींबाबत अनेक दावे केले जात आहेत. या सगळ्याची सुरुवात भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीपासून झाली. बाबरी पाडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक नव्हते, अशा आशयाचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी या विधानावर तीव्र आक्षेप घेत चंद्रकांत पाटील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर वाद चालू असतानाच मनसेनं राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
“बाळासाहेबांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी…”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट करण्यात आलं आहे. यामध्ये “अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा”, असं नमूद केलं आहे.
राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ!
मनसेकडून करण्यात आलेल्या या ट्वीटबरोबर राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी बाबरी मशीद पडली त्या दिवशी अर्थात ६ डिसेंबरची एक आठवण सांगितली आहे. “मला तो प्रसंग आठवतोय जेव्हा मी समोर खालच्या खोलीत बसलो होतो. दुपारची वेळ होती. बाबरी मशीद पडली होती. दीड-दोन तासांत एक फोन आला. बहुधा टाईम्स ऑफ इंडिया की कुठून आला होता. त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की इथे कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. पण भाजपाचे सुंदरलाल भंडारी म्हणतायत की हे सगळं आमच्या भाजपाच्या लोकांनी केलेलं नाहीये. हे कदाचित शिवसैनिकांनी केलं असेल”, असं राज ठाकरे या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.
“मी तिथे होतो. मी तुम्हाला सांगतो, त्याच क्षणी बाळासाहेब म्हणाले होते की जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की त्या वेळेला, त्या क्षणाला ती जबाबदारी अंगावर घेणं ही किती महत्त्वाची गोष्ट होती”, असंही राज ठाकरेंनी सांगितल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीमध्ये बाबरी मशीद पडली त्यावेळची आठवण सांगितली आहे. “त्यावेळी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? हे जनरलाईज करण्याची गरज नाही. कारसेवक हे हिंदू होते. कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की हेच करू शकतील आणि त्यांनी केलं ते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
“जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो, तेव्हा अयोध्येच्या त्या रस्त्यांवर कुत्री भुंकत होती. अशा वातावरणात आम्ही काम केलं. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे तुम्ही काय तुमचे सरदार पाठवले होते का तिथे?” असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी या मुलाखतीमध्ये उपस्थित केला.