महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नगर शहरातून विधानसभेची निवडणूक लढवावी, यासाठी पक्षाची विद्यार्थी शाखा उद्या (सोमवार)पासून शहरात सहय़ांची मोहीम राबवणार आहे. आठवडाभर चालणा-या या ‘कौल जनमताचा’ कार्यक्रमातून एकूण २ लाख सहय़ा संकलित करून मागणीचे निवेदन ठाकरे यांना दिले जाणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सुमित वर्मा यांनी ही माहिती दिली. नगरकरांच्या भावना समजून ठाकरे यांनी नगरमधून निवडणूक लढवावी व शहराला शापमुक्त करावे, पक्षाने जनतेसमोर नवा पर्याय दिला आहे, त्यासाठी नगरकरांनी मोठय़ा संख्येने मोहिमेत सहभागी होण्यााचे आवाहन त्यांनी केले आहे. उद्या दिल्ली गेट व कापड बाजार येथे तर मंगळवारी चितळे रस्ता व सर्जेपुरा भागात नंतर विविध चौकांत ही मोहीम राबवली जाणार आहे.
विद्यार्थी सेनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १४ जूनला सायंकाळी ६ वाजता नंदनवन लॉन येथे करण्याचा व त्या वेळी विद्यार्थ्यांना करीअर मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित विद्यार्थ्यांनी अभिषेक मोरे (९०१११९८०२६) किंवा कौशल रासने (८८८८२३२३२६) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळा किंवा कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेत काही अडथळा येत असेल, कागदपत्रांची अडवणूक होत असेल, देणगीच्या नावाखाली पिळवणूक होत असेल तर संबंधित विद्यार्थ्यांनी मनसेशी संपर्क साधावा. पक्षसंघटना विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहील, शिक्षण संस्था देणगीची सक्ती करत असेल तर मनसे ‘खळ्ळऽ खटय़ाकऽऽ’चा वापर करील, असा इशाराही वर्मा यांनी निवेदनात दिला आहे.
बैठकीला जिल्हाध्यक्ष वैभव सुरवसे, नीलेश गोंधळे, मयूर मैड, मोरे, परेश पुरोहित, शुभम डोईफोडे, रासने, अप्रतिम मुळे, मयूर वर्मा, कार्तिक देशमुख, सागर कुलकर्णी, अमेय मुळे, जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते.
मनसेची आजपासून शहरात सहय़ांची मोहीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नगर शहरातून विधानसभेची निवडणूक लढवावी, यासाठी पक्षाची विद्यार्थी शाखा उद्या (सोमवार)पासून शहरात सहय़ांची मोहीम राबवणार आहे.
First published on: 09-06-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sign campaign starting today in the city