राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा हा चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सत्तेत असणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला ३ मे म्हणजेच ईदपर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. मात्र या भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी भोंग्यांवरुन महागाईबद्दल बोला असा शाब्दिक चिमटा मनसेला गुरुवारी काढला. या टीकेला आता मनसेनंही अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.
नक्की वाचा >> “ब्लु प्रिंट, विकासाच्या कल्पना मशिदींवरील भोंगे, मदरश्यांवर येऊन थांबतात तेव्हा…, राज ठाकरे म्हणजे…”; MNS नेत्याची राजीनाम्याची पोस्ट
राज काय म्हणाले होते?
“मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच”, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.
नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर
आदित्य यांनी काय म्हटलं होतं?
याचसंदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मनसेच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला. “भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दलही लोकांना सांगता आलं तर हेही सांगावं की पेट्रोल-डिझेलची, सीएनजीची दरवाढ कशामुळे झाली? आणि ६० वर्षांपूर्वी न जाता गेल्या २-३ वर्षांत काय झालं हे सांगावं”, असा टोला आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंच्या अल्टीमेटबद्दल बोलताना लगावला.
नक्की वाचा >> मनसेचे बाळा नांदगावकर म्हणतात, “बाळासाहेबांचे बरेच गुण राज ठाकरेंकडे असल्याने…”
मनसेचा आदित्य ठाकरेंवर पटलवार
आदित्य ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर आज सकाळीच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन टोला लगावला आहे. राज ठाकरे यांची मागील दीड वर्षांमध्ये कृष्णकुंजमध्ये जाऊन भेट घेणाऱ्या वेगवेगळ्या गटाच्या लोकांचा संदर्भ देत संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनीच लोकांच्या समस्या सोडवल्याची आठवण करुन दिलीय. “महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राज ठाकरेंनीच सोडवायच्या,” असं संदीप देशपांडे म्हणालेत. पुढे बोलताना त्यांनी, “राज ठाकरेंनीच समस्या सोडवायच्या आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?” असा टोला अप्रत्यक्षपणे आदित्य यांना लगावलाय.
नक्की वाचा >> भोंगा प्रकरणावरील मतभेदांनंतर वसंत मोरेंना ‘शीवतीर्थ’वर पाहताच राज ठाकरेंनी उच्चारले ‘ते’ तीन शब्द; मोरेंनीच केला खुलासा
आता मनसेच्या या टीकेला शिवसेनेकडून काही उत्तर दिलं जातं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या मनसे विरुद्ध शिवसेना वादामध्ये या वक्तव्यामुळे नवीन ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसतेय.