महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुषमा अंधारेंचा ‘स्टूलवाली बाई’ असा उल्लेख करत काळे यांनी निशाणा साधला आहे. ते कराड येथे मनसेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सुषमा अंधारेंवर टीकास्त्र सोडताना गजानन काळे म्हणाले, “सुषमा अंधारे यांच्यासाठी मी नवीन शब्द वापरलाय तो म्हणजे ‘स्टूलवाली बाई’. कधीकाळी मुंबईत मोर्चे निघायचे तेव्हा अहिल्याताई रांगडेकर, मृणालताई गोऱ्हे सगळ्यांच्या समोर असायच्या. मृणालताई गोऱ्हे यांना खास पाणीवाली बाई म्हंटल जायचं. त्या महागाई व पाण्याच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, कुठलंही कर्तृत्व नसताना, सुषमा अंधारेंनी कुठल्याही प्रश्नाला कधीही हात घातला नाही. कोणताही प्रश्न कोणत्याही व्यासपीठावर त्यांनी सोडवलेला नाही.”
हेही वाचा- “महिला बॉसशी लैंगिक संबंध ठेवायला… “, गुगलच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
“सुषमा अंधारे हे पोकळीतून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. त्या कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर होत्या. आता त्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) व्यासपीठावर येऊन बोलत आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना ८० वर्षांचा म्हातारा म्हटलं. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि हिंदू देव-देवतांबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधानं केली. संपूर्ण वारकरी समाज रस्त्यावर आला तरीही उद्धव ठाकरे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. ही कुठली लाचारी आहे?” असा सवाल गजानन काळे यांनी विचारला.
हेही वाचा- “घरोबा एकाबरोबर आणि संसार…”, राधाकृष्ण विखे-पाटलांची महाविकास आघाडीवर खोचक टीका!
काळे पुढे म्हणाले, “आधीच संजय राऊतांनी अर्धा पक्ष संपवला आहे. आता उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचं हे पार्सल घ्यायची गरज काय होती. सुषमा अंधारे म्हणजे राजकारणातला फिरता चषक आहेत. पुढील वर्षभरात त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, तर त्या दुसऱ्या पक्षात दिसतील. मी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होईल, अशी त्यांना नवीन धुमाळी आली आहे. पण त्यांना अजून उद्धव ठाकरे यांच्या स्टाईलची कल्पना नाही. उद्धव ठाकरे यांनी अशीच गाजरे शिवसैनिकांना दिली होती. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, असं ते म्हणाले होते. पण स्वतःचं टुमकन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत जाऊन बसले.”