मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एनडीएला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली, त्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सततच्या बदलत्या भूमिकांना कंटाळून मनसेचा राजीनामा दिला आहे. मनसेचे प्रवक्ते कीर्तीकुमार शिंदे यांनीही खुले पत्र लिहून राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडींवर मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नेत्याचा एखादा निर्णय आवडला नाही, म्हणून लगेच राजीनामा देणे योग्य नाही. आमचे नेते राज ठाकरेंमुळे आमची प्रतिष्ठा आहे. वेगळे मत असू शकते, पण त्यामुळे पक्ष सोडणे योग्य नाही. तसेच जे लोक पक्ष सोडून जात आहेत, ते फार महत्त्वाचे नेते नसून त्यांच्यामुळे इतरांवर फार प्रभाव पडणार नाही, असेही प्रकाश महाजन म्हणाले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश महाजन यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर बोलत असताना प्रकाश महाजन म्हणाले, “भाजपाच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचा उमेदवार बदलला. तेव्हा माध्यमांनी त्यांना कुठे प्रश्न विचारला? भावना गवळी यांना कुणी बदललं? सगळीकडेच काहीतरी कुरबुर असते. राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतला असून हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या देशाचे हित महत्त्वाचे आहे. त्यांची हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाळ जोडली गेली आहे. टीका करणारे असे समजत होते की, राज ठाकरे मोदींना पाठिंबा देणार नाहीत. पण आता पाठिंबा दिल्यानंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली. जर त्यांच्या लेखी राज ठाकरेंचे महत्त्व नव्हते, तर आता टीका कशाला?”
मनसेला धक्का! राज ठाकरेंना पत्र लिहित मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा
एनडीएचा प्रचार करण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील
राज ठाकरेंवर कोणताही कार्यकर्ता नाराज नाही. २०१९ पासून देशात जे निर्णय झाले, ते डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांनी सदर निर्णय घेतला आहे. ३७० कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी सर्वात मोठा मोर्चा काढला होता. राम मंदिर झाले, हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. आज भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेत भारत पुढे चालला आहे. हा सगळा विचार करून ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभेचा प्रचार करायचा की नाही हा राज ठाकरे यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असेही प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे श्रीकृष्णाच्या भूमिकेत
राजकारण हे धर्मयुद्ध आहे आणि राज ठाकरे हे श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहेत, असेही विधान या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश महाजन यांनी केले. श्रीकृष्णाचा पाठिंबा घेण्यासाठी महाभारतात कोण कोण गेले होते आणि श्रीकृष्णाने धर्माच्या आधारावर कुणाला पाठिंबा दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याप्रमाणे राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे, अशी तुलना प्रकाश महाजन यांनी केली. “आम्ही हिंदू धर्माची आणि मराठी माणसाची भूमिका कधीही बदलली नव्हती. राजकारणात कधी आपत धर्म, शापत धर्म अवलंबावा लागतो. फायद्यासाठी राज ठाकरे कोणाशी नाते जोडत नाही. त्यांनी कधीही कोणतीही अपेक्षा ठेवली नाही”, असेही प्रकाश महाजन म्हणाले.