पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ शुक्रवारी मनसे विद्यार्थी आघाडीच्या वतीने विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राला टाळे ठोकले. काही महिन्यांपासून पुणे विद्यापीठाचा कारभार वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरला आहे. परीक्षा व निकालात गोंधळाची स्थिती कायम असून वेळेवर निकाल जाहीर करणेही विद्यापीठाला शक्य झालेले नाही. परीक्षा नियंत्रक त्यास जबाबदार असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ मनसे विद्यार्थी आघाडीच्या वतीने शुक्रवारी विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रावर धडक देण्यात आली. परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांनी कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष केल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. परीक्षेला विद्यार्थी उपस्थित असूनही अनुपस्थित दर्शविणे, पदवी प्राप्त केल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांमधील दोष, अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांच्या परीक्षेचा निकाल १०० दिवस उलटूनही लागलेला नाही, असे अनेक मुद्दे विद्यार्थी आघाडीने मांडले. कुलगुरूंनी या प्रकरणात लक्ष न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आघाडीने दिला होता. महिना उलटून त्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्याने आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पुणे विद्यापीठाचे यूसीडी सदस्य व्ही. बी. गायकवाड यांनी विद्यापीठाचे समन्वयक आणि आंदोलकांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मेढे यांनी ‘परीक्षा नियंत्रक हटवा, पुणे विद्यापीठ वाचवा’ ही आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करीत कारवाईची मागणी केली. कुलगुरूंनी १२ मार्चला होणाऱ्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.

Story img Loader