लोकसत्ता प्रतिनिधी

रत्नागिरी – रत्नागिरीमधील प्रदूषण वाढत असून, जाणीवशून्य अधिकारीच सोईस्कर वागत असल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील काही उद्योजकांचे धाडस वाढले आहेत. येत्या दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रत्नागिरी कार्यालयास टाळे ठोकून मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील जलप्रदूषण याबाबत आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या सूचने नंतर मनसेचे शिष्टमंडळ रत्नागिरी औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत इशारा पत्र देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी यांना भेटण्यासाठी गेले असता अधिकारी जागेवर नव्हते. ब-याच वेळा ते बाहेर असतात अशी उत्तर मिळताच मनसे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी थेट उपप्रादेशिक अधिकारी यांनाच फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने मी जमेल तसा येतो. येणार असेल तर तेव्हा कळवतो.

ही गोष्ट ऐकताच सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या विभागाच्या गैरकारभाराचा पाढाच वाचला. या असल्या जाणीवशून्य अधिकाऱ्यांमुळेच रत्नागिरीमधील प्रदूषण वाढत चालले आहेत. अधिकारीच सोईस्कर वागत असल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील काही उद्योजकांचे धाडस वाढले आहेत. मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांमधून दूषित पाणी टँकरद्वारे थेट समुद्रात सोडले जाते. त्यामुळे समुद्रात व खाडीमध्ये प्रदूषण वाढले असून, त्याचा परिणाम मासेमारीवर होत आहे. या बाबत जाब विचारतानाच निवासी जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात पत्र देऊन संबंधित विभागाची तक्रार करण्यात आली.

येत्या दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रत्नागिरी कार्यालयास टाळे ठोकून मनसे स्टाईलने आंदोलनाचा व या विभागाचे संबंधित अधिकारी शोध मोहीम राबावण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा सचिव व कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, महिला शहर अध्यक्ष शुस्मिता सुर्वे, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.