महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यात सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू असताना दुसरीकडे अधिवेशनातील नेत्यांच्या भाषणांवरून सभागृहाबाहेर राजकारण रंगताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. त्याच वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा संवाद झाला. सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपबाबबत सतेज पाटलांनी सरकारला विचारणा केली. त्यावर “फेलोशिप घेऊन विद्यार्थी काय करणार आहेत?” असा प्रश्न अजित पवारांनी केला. त्यावर सतेज पाटील यांनी “हे विद्यार्थी पीएचडी करतील”, असं उत्तर दिलं. यावर बोलताना अजित पवारांनी “पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत? या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह आयएएस, आयपीएस, आयआरएस अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करायला हवेत”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावर सविस्तर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात अजित पवारांच्या विधानावर परखड शब्दांत भाष्य करण्यात आलं आहे.

“अजितदादा, महाराष्ट्र हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं ठरतं ते शिक्षणाच्या संधींमुळे आणि त्याबद्दलची आस प्रचंड आहे म्हणूनच. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः डॉक्टरेट होते आणि त्यांना सचोटीने, संघर्षाने मिळविलेला हा बहुमान हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना प्रेरित करतो की एखाद्या विषयात दीर्घ अभ्यास करून पारंगत होऊन, पीएचडी मिळवावी. सारथी, महाज्योती, बार्टी ह्या संस्थांच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बहुजनांची मुलं उच्चशिक्षित होणार ना?” असा सवाल मनसेकडून करण्यात आला आहे.

“पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार?”, अजित पवारांचं सभागृहात वक्तव्य

“स्वत:ला टग्या म्हटलं म्हणजे…”

“महाराष्ट्राचा उप-उपमुख्यमंत्री इतकं बेजबाबदार विधान आणि तेही सभागृहात करूच कसा शकतो? “मी स्पष्टवक्ता, मी कठोर, मी टग्या…” असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे महाराष्ट्राने तुमची वाट्टेल ती विधान सहन करायची का?” असा सवाल मनसेनं केला आहे.

“तुम्ही स्वतःला टगे म्हणवून घेता. कारण तुमची टगेगिरी खपवून घेणारी व्यवस्था तुमच्या पायाशी आली. पण तुमच्यासारखं नशीब प्रत्येकाचं कसं असणार? म्हणून शिकून, पीएचडी करून, चांगली नोकरी करून, सचोटीने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगत महाराष्ट्रातले तरुण-तरुणी राबत असतात. ते ज्ञानाचा दिवा लावत आहेत. त्यामुळे त्यांना तरी तुमच्या टगेगिरीचा प्रसाद देऊ नका”, अशा शब्दांत मनसेनं अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

Story img Loader