Rahul Gandhi Public Meeting at Shegaon Buldana: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधींच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच मनसेने राहुल गांधींची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने निघाले आहेत.
ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईहून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती दिली. मुंबईहून ठाणे, भिवंडी, नाशिक असा प्रवास करत ते शेगावला पोहोचणार आहे. संदीप देशपांडे यांनी यावेळी काँग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे.
“काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आमच्या अविनाश यांनी अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत,” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
“महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावला पोहोचतील. सावकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणार आहोत. पोलिसांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करु,” असंही ते इशारा देताना म्हणाले आहेत.
शेगाव येथे उद्या काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन
“सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्रातील नेते चालत आहेत. हे दुर्दैवी आहे. आमचे कार्यकर्ते म्हणतात त्याप्रमाणे अशा लोकांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,” असा टोला संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवर बोलताना लगावला.
“काँग्रेसने वल्गना करण्याची गरज नाही. काँग्रेसची काय ताकद आहे हे आम्हाला माहित आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा इतिहास त्यांना माहिती नाही,” असंही ते म्हणाले आहेत. त्यांना धडा शिकवण्याची गरज असून आम्ही तो शिकवणार आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.