लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जागावाटप आणि मतदारसंघातील पक्षबांधणीकरता पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असून रणनीती आखली जात आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षमेळावा घेतला होता. या मेळाव्यात २०० ते २१५ जागा लढणार असल्याचं पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माध्यमांना आज सांगितलं. ते आज एबीपी माझाशी बोलत होते.
“राज ठाकरे यांनी आमच्या पक्षमेळाव्यात जाहीर केलं होतं की आम्ही २००-२१५ जागा लढवणार आहोत. राज ठाकरेंनी असा निर्णय घेतला असेल तर आम्ही कार्यकर्ते तयार आहोत”, असं प्रकाश महाजन म्हणाले. मतदारसंघातील आढाव्यासाठी राज ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात निरिक्षक नेमले होते. त्यांचा अहवाल आल्यानंतरच राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचं प्रकाश महाजन म्हणाले.
हेही वाचा >> कारण राजकारण: राज-शिंदे जवळीक राजू यांना तारक?
जातीय आरक्षणावर काय म्हणाले प्रकाश महाजन?
जातीय आरक्षणाला माझ्या पक्षाचा विरोध आहे. माझे नेते जात पात मानत नाहीत. आमचं म्हणणं आहे की जातीपेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण असावं. पण समाजाच्या काही घटकाचे ते म्हणणं असेल तर हा प्रश्न सामोपचाराने सुटेल. मागे राज साहेबांनी सांगितलं होतं की सत्तेत असलेले आणि सत्तेत नसलेले या सगळ्यांना हे आरक्षण मान्य आहे तर अडलं कुठे?”, असं प्रकाश महाजन म्हणाले.
“मराठवाड्यातील असल्याने आमच्याकडे कासीम रिझवी नावाचा रझाकार होता. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील मुस्लिमांचे कासीम रिझवी आहेत. यांना मुसलमानांविषयी प्रचंड प्रेम आहे. मुसलमानांही यांच्याविषयी प्रेम आहे”, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
हेही वाचा >> Sharad Pawar : “राज ठाकरे महिन्याभराने जागे झाल्यावर…”, शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, “जनता ज्याची दखल…
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी प्रचंड प्रयत्न केले. ते भाजपाबरोबर युती करून काही जागा लढवतील अशी अटकळ बांधली गेली. परंतु, ही अटकळ खोटी ठरली. कारण, त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते महायुतीतून लढणार की स्वबळाने निवडणूक लढवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, त्यांनी २००-२१५ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना स्वबळावरच निवडणूक लढवावी लागेल, हे स्पष्ट आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.