विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं. तर कोकण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आमने-सामने येण्याची शक्यता होती. त्याआधीच आता मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली आहे.

मनसेचे नेते अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत विधानपरिषदेच्या पदवीधर कोकण मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती होती. त्यानंतर मनेसेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आता आमने-सामने येणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : ‘शक्तिपीठ’वर महायुतीची ‘शक्ती’ क्षीण; महामार्गावरील ११ मतदारसंघांत पराभव

नितीन सरदेसाई काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. फक्त निरंजन डावखरे हे उमेदवार असतील, असं ठरलं आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा ते दोनदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.

मनसेचा या निवडणुकीतही बिनशर्त पाठिंबा देणार का?

विधानपरिषदेच्या कोकण मतदारसंघातून मनसेनी माघार घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसारखं मनसे या निवडणुकीतही भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणार का? असा प्रश्न नितीन सरदेसाई यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, “याबाबत राज ठाकरे स्वत: बोलणार आहेत. मात्र, अशी गोष्ट वारंवार होणार नाही, असंही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे”, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

निरंजन डावखरेंनी राज ठाकरेंची घेतली भेट

कोकण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.