मागील दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी एका वृद्ध महिलेला शिवीगाळ करत धक्काबुक्की करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर गुरुवारी संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
२८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या नागपाडा परिसरात ही मारहाण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला एनसी दाखल केली, त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनसे पदाधिकारी विनोद अलगिरे, राजे अलगिरे आणि सतीश लाड या तिघांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित तिघांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पीडित महिलेनं एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. संबंधित व्हिडीओ पाहून आजही रडायला येतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा- कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई; लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर शिवामूर्तींना अटक
पीडित महिलेनं ‘टीव्ही९ मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, घटनेच्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी पीडित महिला आपल्या दुकानाजवळ उभ्या होत्या. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दुकानासमोर बॅनर लावण्यासाठी खोदकाम करायला सुरुवात केली. पण दुकानासमोर बॅनर लावला तर संपूर्ण दुकान झाकून जाईल, म्हणून पीडित महिलेनं अर्धा फूट पुढे बॅनर लावा, अशी विनंती केली. मात्र, मनसे पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का? असा सवाल करत मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. हा बॅनर इथेच लावला जाईल, हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? तुला जे करायचं आहे, ते तू कर…अशी धमकीही मनसे पदाधिकाऱ्यानं दिल्याचं पीडित महिलेनं सांगितलं.
पोलिसांनी केलेल्या कारवाईवर समाधानी आहात का? असं विचारलं असता पीडित महिलेनं सांगितलं की, “पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संतुष्ट आहे. पण त्यांनी केलेली मारहाण खूप वेदनादायी आहे. तो व्हिडीओ पाहून मला आजही रडायला येतं. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, कारण ते पुन्हा कोणत्या महिलेसोबत अशाप्रकारे वागणार नाहीत. ज्यांना जनतेचं संरक्षण करण्यासाठी ठेवलं आहे, तेच लोकं जनतेला किंवा महिलांना अशी मारहाण करत आहेत” असंही त्या यावेळी म्हणाल्या.