अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडल्याने मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली असल्याचा दावा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी या घटनेचा एक व्हीडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तर या व्हीडिओवरून त्यांनी राज्य सरकारवर टीकाही केली आहे.
विजय वडेट्टीवारांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये एका मध्यमवयीन व्यक्तीला चौघांकडून मारहाण होत असताना दिसते आहे. या व्यक्तीला या चौघांकडून लाथा-बुक्क्यांनी मारलं. या मारहाणीत या व्यक्तीचे कपडेही फाटले आहेत. तर, कॅमेरासमोर बघून त्याला माफी मागण्याचीही धमकी दिली जात आहे.
हेही वाचा >> रोहित पवार ईडीसमोर हजर; सुप्रिया सुळे म्हणतात, “केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार…”
विजय वडेट्टीवारांनी हा व्हीडिओ पोस्ट करताना म्हटलंय की, अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे व्हीडिओ समोर आला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे नेते असे दादागिरी करतात आणि कारवाई होत नाही. सत्ताधारी नेत्यांना दादागिरी करण्याचे, कायदा हातात घेण्याचे लायसन्स सरकारने दिले आहे का? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
दरम्यान, या व्हीडिओमागची सतत्या अद्यापही समोर आलेली नाही. परंतु, विजय वडेट्टीवारांनी शेअर केलेल्या या व्हीडिओवरून विरोधक आणि मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.