मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीतील राजापुरात तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. “कोणाकोणाला कशाप्रकारच्या ऑफर दिल्या आहेत, हे मला माहित आहे”, असं ठाकरे यावेळी म्हणाले. “राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. परंतू माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाहीय, मला त्यांचा अभिमान वाटतो”, असं म्हणत त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.
राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांवरुन टोलेबाजी करताना “गेल्या दोन-अडीच वर्षांपासून निवडणुकांची पाईपलाईन तुटली आहे” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. आगामी वर्षात फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणुका होण्याचा कयासही त्यांनी वर्तवला आहे. येत्या जानेवारीमध्ये पुन्हा कोकण दौरा करणार असल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं. या दौऱ्यात मराठी माणूस, हिंदुत्वासह राज्यातील अनेक विषयांवर भूमिका मांडणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दौऱ्याची माहिती ८ ते १० दिवस आधीच देण्यात आली होती, तरीही बऱ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीचा थांगपत्ता नव्हता. या बैठकीला राज ठाकरे आणि अमित ठाकरे गैरहजर राहिले. या घटनाक्रमानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे, याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.