अलिबाग- मुंबई गोवा महामार्गासाठी असे आंदोलन करा की लक्षात राहील असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला होता. या आदेशानंतर मनसेचेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या माणगाव येथील ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड केली. जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान ठेकेदारांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>> “शरद पवारांनी अजून कितीवेळा…”, ‘त्या’ प्रश्नावर जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथे निर्धार मेळावा घेतला. या निर्धार मेळाव्यात महामार्गाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याचे निर्देश त्यांनी मनसैनिकांना दिले. असे आंदोलन करा की यापुढे मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनाची भिती रस्ते करणाऱ्यांना राहीली पाहीजे. मी तुमच्या सोबत आहे. माझी गरज लागेल तिथे हक्काने बोलवा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> “मी पुन्हा येईन”; मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांसारखी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांच्या निर्देशानंतर रायगड जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी माणगाव येथील मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. कार्यालयातील टेबल खुर्च्यांची तोडफोड केली आहे. चेतक अँड सन्नी कंपनीच्या कार्यालयाचे मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने ते बचावले आहेत. जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते संध्याकाळी साडे चारच्या सुमारास या ठेकेदाराच्या कार्यालयात घुसले त्यानी घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान या घटनेची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून, कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले आहेत.