धुळे जिल्ह्यात नववर्षाच्या उत्साहाला गालबोट लागले असून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याला हटकले म्हणून मद्यपींसह 10 जणांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोमवारी नववर्ष स्वागतप्रसंगी फागणे गावात काही जण मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर येऊन धिंगाणा घालत होते. यावेळी गस्तीवर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, हवालदार गोकुळ लेाहार, मोहने यांनी मद्यपींना हटकले. याचा राग येऊन मद्यपींसह ग्रामस्थांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला. हातातील बाटल्या पोलिसांवर फेकून वाघ आणि लोहार यांना बेदम मारहाण केली.

पोलिसांनी स्वत:ची कशीबशी सुटका करुन पळ काढला. वाघ आणि लोहार यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मगन सूर्यवंशी, लोटन उर्फ विशाल सूर्यवंशी, तन्मय सूर्यवंशी, भटू अहिरे, आनंद धनगर यांच्यासह अन्य पाच जणांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader