एकेकाळी लोकसंख्या हा भारतासमोरचा कळीचा प्रश्न होता. आज मात्र जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात कुशल मनुष्यबळ निर्माण करून देशाला सामथ्र्यवान करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मानव विकास मिशनचे प्रमुख भास्कर मुंडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘ओपन डे’ उपक्रमात फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन भास्कर मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. मीना पाटील उपस्थित होत्या. मानव विकास मिशनच्या ४५ लाख रुपयांच्या निधीतून विद्यापीठाला ‘सायन्स ऑन व्हिल्स’ अर्थात फिरती प्रयोगशाळा मिळाली आहे. कोलकाता येथून ही फिरती प्रयोगशाळा विद्यापीठात पोहोचली आहे. या प्रसंगी  मुंडे म्हणाले, ज्या विद्यापीठात मी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्याच विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचे भाग्य मला लाभले. विद्यापीठासाठी काही देता आले, याचे मला समाधान वाटते. जपानी माणसाकडून आपण चिकाटी शिकली पाहिजे, असेही ते म्हणाले. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेनंतर आता माती परीक्षण व शेतकऱ्यांना अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करून देणारी फिरती कृषी प्रयोगशाळा विकसित करण्याचा मानस कुलगुरू चोपडे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले.
विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत चारही जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना या फिरत्या प्रयोगशाळेचा लाभ मिळेल. हसत-खेळत विज्ञान अंतर्गत प्राप्त या गाडीत मानवाच्या पंचइंद्रियांची सविस्तर माहिती, मानव उत्क्रांती, गणित, विज्ञान, खगोलशास्त्र आदी २० प्रयोग मांडण्यात आले आहेत, अशी माहिती या उपक्रमाच्या प्रमुख डॉ. मीना पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा