गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शिक्षणाची प्रगती चांगली नाही असे मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून राज्यातील ६७ हजार शिक्षकांना शिक्षकांना ब्रिटिश सरकारच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तेचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्पर्धेत उतरेल असा आशावाद व्यक्त केला. देश संपन्न करावयाचा असेल तर नैसर्गिक संपत्तीपेक्षा बौद्धिक क्षमतेवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रवार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्रजी पवार, स्वागताध्यक्ष ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, कामगारमंत्री हसन मुश्रिफ, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शालेय राज्यमंत्री फौजिया खान, शिक्षक नेते शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात, एस. डी. पाटील, जि. प. अध्यक्षा निकिता परब, आमदार दीपक केसरकर, आम. उदय सामंत, आय. के. पी. पाटील, माजी आमदार शिवराम दळवी व अन्य उपस्थित होते.
राज्यातील महिला तर चिंतेचा असून राज्याचा विकास करताना भावी पिढी डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. शहरी कारणामुळे ग्रामीण भागात जि. प. शाळा ओस पडत असल्या तरी गुणवत्ताधारक शिक्षणाची गरज आहे. आठवीपासून इंग्रजी शिक्षणाची पूर्वीची सक्ती अनेक पिढय़ांचे नुकसान करणारी ठरली असल्याने यापुढे ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाची सुविधा निर्माण करण्याची गरज ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
शहर व ग्रामीण असा शिक्षणाच्या बाबतीत भेदभाव नको म्हणूनच ब्रिटिश सरकारच्या मदतीने ६७ हजार शिक्षकांना भावी पिढी बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री ना. चव्हाण म्हणाले.
आज राज्यात सव्वा दोन लाख मुले शिक्षणाच्या बाहेर आहेत. त्यांना ज्ञानवर्धन कसे होता येईल याचा विचार केला जात आहे असे मुख्यमंत्री ना. चव्हाण म्हणाले. त्यासाठी २३७२ नवीन प्राथमिक शाळांना मान्यता देण्यात आली आहे. कॉपीमुक्त महाराष्ट्र बनविताना आनंददायी शिक्षण पद्धतीने भावी पिढी जागतिक स्पर्धेत कशी टिकेल याचे आवाहन स्वीकारताना विचार मंथनातून निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे असे ना. चव्हाण म्हणाले. देशात नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता आहे. त्यामुळे पेट्रोलियम तेल आयात करावे लागते. त्यावर देशाची आर्थिक स्थिती ठरते. राज्यात आज भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे देशाच्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून राहतानाच बौद्धिक क्षमतेवर भर दिला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भावी पिढी जावू शकेल असे सांगून सक्तीचे मोफत शिक्षण, शिक्षकांची गुणवत्ता, प्रसूती वेळेच्या रजा शिक्षक, अप्रशिक्षित शिक्षकांना निवृत्तीवेतन यावर सत्कार निश्चित विचार करेल असे ना. चव्हाण म्हणाले.
शिक्षकांना निवडणूक व जनगणना व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त काम दिले जाणार नाही. महानगरपालिका शिक्षण मंडळाचा अभ्यास करून शिक्षकाचा प्रश्न सोडविला जाईल. तसेच चंगळवाद संस्कृतीची मानसिकता बदलणारा समाज घडविण्याची जबाबदारी सर्वानी स्वीकारावी, असे ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी आवाहन केले.
या वेळी शिक्षकनेते शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्यातील भांडण मिटवून हा एकता मेळावा घेतल्याचे केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्रजी पवार यांनी सांगून ग्रामीण भागात इंग्रजीसह दर्जेदार शिक्षणाची सेवा दिल्यास जिल्हा परिषद शाळा ओस पडणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकनेते शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांनी नव्या पिढीला नव्या दलाचे संघटन कौशल्य असणारे नेतृत्व देवून सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात भर द्यावा. तसेच महाराष्ट्र गुणवत्ता संपन्न बनवावा, असे ना. पवार यांनी आवाहन केले.
ग्रामीण विकासमंत्री स्वागताध्यक्ष जयंत पाटील यांनी शिक्षणात सुधार करण्यासाठी चिंतन, मनन करण्याची गरज असून मानवी जीवनात सुधारणा करण्यासाठी दर्जेदार शिक्षण हवे. राज्यात शिक्षणात आमूलाग्र बदल घडविले जात आहेत. त्यासाठीच गुणवत्ताधारक शिक्षण आणतानाच ग्रामीण भागात शहरी शिक्षण देण्याची गरज ना. पाटील यांनी व्यक्त केली. इंग्रजी शिक्षणासाठी सरकार निर्णय घेईल. शिवाय अप्रशिक्षित शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळेलअसा प्रयत्न केला जाईल, असे म्हणाले. प्राथमिक शाळात बायोमेट्रीक बसविण्याचा विचार व्हावा. प्रसूती, रजा काळात पर्यायी शिक्षक तासिका पद्धतीने देता येईल का? असा विचार केला जाईल असे ना. जयंत पाटील म्हणाले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना. फौजिया खान, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकनेते शिवाजीराव पाटील व संभाजी थोरात यांनी शिक्षकांना भेडसावणारे प्रश्न मांडत या अधिवेशनावर टीका झाली असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सुट्टी कालावधी भरून काढला जाईल, असे जाहीर केले.
समाजरत्न पुरस्काराने आयपीएस हेमंत निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांना गौरविण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केले. राज्यभरातून या शिक्षक संमेलनात लाखभर शिक्षक आले होते. त्यांच्यापैकी काहींनी सिंधुदुर्ग व गोवा पर्यटन सहलही केली.