गेल्या तीन महिन्याच्या कारकीर्दीत मोदी सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा धोका उत्पन्न झाला असून नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचा आरोप रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विटा येथे झालेल्या जाहीर सभेत केला.
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी पवार सांगली जिल्ह्यातील विटा आणि जत येथे आले होते. तासगाव येथे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग आणि प्रकल्प गुजरातला पळविले जात असून ते केवळ त्याच राज्याचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. आर. आर. पाटील यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे नेतृत्व उद्ध्वस्त करण्यासाठी तासगावसारख्या लहान शहरात पंतप्रधान येतात हे आबांचेच महत्त्व वाढविण्याचा प्रकार आहे.
भाजपाने प्रचार यंत्रणा खालच्या पातळीवर नेली असून या प्रचारामुळे महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव रचला गेला असून हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्यांमुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. मोदी सरकारकडून सामान्य जनतेच्या अपेक्षा होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांत या अपेक्षा फोल ठरल्या असल्याचेही ते म्हणाले. या सभेसाठी जयंत पाटील, आर. आर. पाटील, अमरसिंह देशमुख, बाबासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा