पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी जाहीर सभांना संबोधित देखील केलं. विदर्भ आणि खान्देशमध्ये हे कार्यक्रम आयोजित होते. मात्र यवतमाळमध्ये कार्यक्रम सुरु होण्याआधीच नरेंद्र मोदींविरोधात बॅनरबाजी करण्यात आल्याचं पहायला मिळालं.
नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता नागपूरला पोहोचले होते. त्यानंतर हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे पोहोचले. याआधी पांढरकवडा येथे नरेंद्र मोदींविरोधात बॅनरबाजी करण्यात आली. कोंगरा मार्गावर नरेंद्र मोदींना विरोध दर्शवत मोदी गो बॅकचे बॅनर्स लावण्यात आले होते.
नरेंद्र मोदी येणार असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. मोदींविरोधात बॅनर लागले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत ते हटवले. युवक काँग्रेसने हे पोस्टर लावले होते अशी माहिती मिळत आहे.