शिर्डी : हिंदूत्वावर आधारित ‘फॅसिझम’ आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राजकीय ध्रुवीकरण, स्वायत्त संस्थांचे खासगीकरण, आरक्षणविरोध, मनुवादी वर्चस्ववाद, आक्रमक राष्ट्रवाद असा पाच कलमी कार्यक्रम राबवला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी शिर्डी येथे केला. मराठा आरक्षणाबाबतही महाराष्ट्रात फसवणूक झाल्याची भावना असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ‘ज्योत निष्ठेची – लोकशाहीच्या संरक्षणाची’ या शीर्षकाचे दोनदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचा समारोप पवार यांच्या भाषणाने करण्यात आला. पवार म्हणाले की, देशात सर्वत्र हिंदूत्वावर आधारित कट्टरता वाढलेली आहे. ती संपवायची असेल तर याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे मोदी सरकार बदलणे. परंतु मोदी यांना पर्याय नाही असे फसवे, खोटे चित्र उभे केले जात आहे. खोटा प्रचार केला जात आहे. ‘इंडिया’ आघाडी हा पर्याय उभा करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत इंडिया आघाडीची निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट होईल. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे, डावे, शेकाप आणि वंचित आघाडी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सरकारला आव्हान देऊ शकतात, त्याला जनमानसाचा आशीर्वाद मिळेल, असा आशावादही पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> “८५ वर्षांच्या लोकांनी…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “माझ्या ३०-३५ वर्षांच्या…”
देशातील सध्याचे चित्र भाजपला अनुकूल नाही. कारण अनेक राज्यांत भाजप अस्तित्वातदेखील नाही, तरी ४१५ जागा मिळतील असा दावा केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे केवळ सत्तेचा वापर करून, लोकांची फसवणूक करून आणि आमदार फोडून सत्ता मिळवली जात आहे. मोदी आणि त्यांचे भक्त आकर्षक मांडणी करतात, धोरण ठरवतात. मात्र त्याची ते अंमलबजावणी करू शकत नाहीत. लोकांची फसवणूक करतात, हे स्पष्ट होत आहे, असे पवार म्हणाले.
सध्या लोकसंख्येचा मोठा दबाव शेतीवर निर्माण झाला आहे. धरणे, शहरीकरण, विकासकामांमुळे शेतीवरचा बोजा वाढतो आहे. शेतजमीन कमी होत चालली आहे. म्हणून शेतीवरचा बोजा कमी करून त्याला अन्य पर्याय द्यावा, त्याशिवाय गरिबी कमी होणार नाही, अशी मागणी आम्ही केली. परंतु शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले की बंधने आणली जातात, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांमधील वाढती बेरोजगारी ही दु:खद घटना आहे, अशी टीका पवार यांनी केली.
गाय, गोमूत्राच्या विचारधारेला महत्त्व
लहान घटकांना मदत न करण्याची सरकारची भूमिका आहे. आम्ही शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांनुसार काम करतो. त्यांच्या हाती सत्ता असल्यामुळे ते गाय, गोमूत्र अशा विचारधारेला महत्त्व देत आहेत, अशी टीकाही पवार यांनी केली.
राष्ट्रपतीपदाचा सन्मान किती ठेवला जातो?
राष्ट्रपतीपदी आदिवासी महिलेला स्थान दिल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे, परंतु सरकारकडून या पदाचा कितपत सन्मान ठेवला जातो, याबद्दल शंका येते. संसदेची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होत असते. परंतु राष्ट्रपतींना उद्घाटनप्रसंगी बोलावले गेले नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. नवा कायदा आणला मात्र त्याची अंमलबजावणी चार वर्षांनी होणार हे तर्कसंगत आहे का, असाही प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानपदाचा चेहरा विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, पदाबाबत एकवाक्यता नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे. परंतु तुम्ही चिंता करू नका, आणीबाणीनंतरही अशीच परिस्थिती होती. त्या वेळीही इंदिरा गांधी यांच्याविरोधात उमेदवार नव्हता; परंतु निवडणुकीनंतर जन्म झालेल्या जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, अशी आठवण पवार यांनी सांगितली.