महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं की, आमदार बंडखोरी करत असताना त्यांनी या आमदारांना का रोखलं नाही. ठाकरे म्हणाले की, “आमदार बंडखोरी करणार हे माहिती होतं.”
माजी मुख्यमंत्री म्हणाले की, “जी माणसं विकली गेली आहेत त्यांना सोबत घेऊन मी ही लढाई लढू शकणार नव्हतो. मला विकाऊ माणसं नको, मला लढाऊ माणसं हवी आहेत. मी त्या सर्वांना बोलावून स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, दरवाजा उघडा आहे. ज्यांना जायचं आहे त्यांनी निघून जावं, ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबावं. कारण ही विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्या लोकांनी (भाजपाने) आता सांगितलं आहे की, नरेंद्र मोदी म्हणजेच देश, मग आमचा सवाल आहे की, भारतमाता कुठे आहे? मोदी म्हणजेच देश असं असेल तर आता त्यांनी सर्वांनी मोदी जिंदाबाद असं बोलावं, भारत माता की जय कशाला बोलता?”
हे ही वाचा >> “तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक, तुम्ही स्वभावाने…” देवेंद्र फडणवीसांच्या वाक्यावर अजितदादांची खळखळून दाद
“अन्यथा २०२४ नंतर भारतात निवडणूक होणार नाही”
दरम्यान, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना म्हणले की, “मी माझ्या या माझ्या सहकाऱ्यांसोबत सभा घेणार. पण गावखेड्यात, घराघरात जाऊन तुम्हाला जनतेला सत्य परिस्थिती सागायची आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. अन्यथा २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात निवडणूक होणार नाही.”