वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी जाहीर सभा घेऊन त्यांनी मोदींविरोधात रणशिंग फुंकलं आहे. तसंच, मोदींना हरवायचं असेल तर जागा वाटपात न अडकता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. यापुढे जाऊन, मोदी भ्रष्टाचारी आहेत की नाही याबाबत आज त्यांनी जाहीर सभेत भाष्य केलं. ते आज अकोल्यात बोलत होते.
“मोदी घोषणा करतात की ना खाऊंगा, ना खाने दुंगा. (मी भ्रष्टाचार करणार नाही, दुसऱ्यालाही करू देणार नाही). आपल्याला काय वाटतं, याने बायको सोडून दिली आहे. मुलंही नाहीत. मग कोणासाठी कमावणार? आपल्यालाही खरं वाटतं. की एकटाच आहे, हा एकटाच आहे तर कमवणार कोणासाठी? आगे पिछे कोणीच नाहीय. आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो का बाबा खरं बोलतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “या बाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही (लाच घेत नाही किंवा भ्रष्टाचार करत नाही) हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो. पण तो दुसऱ्यांना खिलवतो हे लक्षात घ्या. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्यांना खिलवतो. आणि दुसऱ्यांना खिलवून झालं की त्यांना म्हणतो की अर्ध मला”, असा आरोप आंबेडकरांनी केला.
हेही वाचा >> “देशात बहुसंख्य हिंदू, मग धार्मिक राजकारण कशासाठी?”, अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लाखो हिंदू कुटुंबांचे पलायन…”
पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते आंबेडकर?
प्रकाश आंबेडकरांनी आज सकाळी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी ते म्हणाले, भाजपा व आरएसएस दोन्ही असे म्हणतात की आम्ही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहोत. देशात बहुसंख्य पूर्णपणे हिंदू आहेत. मग धार्मिक राजकारण कशासाठी असा आमचा प्रश्न आहे. त्याचा खुलासा होत नाही. गत दहा वर्षात ज्या कारवाया झाल्या त्यातून इतिहासातील हे भांडण असल्याचे दिसते. संतांनी जी मांडणी केली ती व्यक्ती व सामूहिक स्वातंत्र्याची आहे. वैदिक धर्मातील जी सामाजिक मांडणी आहे ती व्यक्तिस्वातंत्र्य तसेच सहजीवन नाकारणारी आहे. यातून संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे. त्याविरोधात भाजप व आरएसएस या ठिकाणी दिसते.
“उद्याचे संविधान कसे असेल याची ते चर्चा करीत नाही. पण जे सूचक वक्तव्ये येतात त्यातून हिटलरशाहीस पुरुस्कृत करणारी घटना असेल. आम्ही सांगू तसे करा. आम्ही सांगतो तसेच करा. तोच उद्याच्या नवीन घटनेचा पाया असेल. ही रचना येतांना आपल्याला विरोध होवू नये म्हणून अत्यंत सावध, पद्धतशीरपणे, जाणीवपूर्वक हिटलरशाहिस मानणार नाही असे देशाबाहेर कसे अशी परिस्थिती निर्माण केल्या गेली”, असंही ते म्हणाले.