एफआरपी अदा करण्यासाठी साखर कारखानदारांनी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात चेंडू टोलवला, पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय पंतप्रधानांकडे उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. यामुळे हा विषय आता राज्याच्या राजधानीतून केंद्राच्या राजधानीच्या दिशेने सरकला आहे. पंतप्रधान उद्या (दि.8 बुधवारी) सोलापूर दौऱ्यावर येणार असून ते या तापलेल्या विषयावर काही भूमिका घेणार का याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष शेटे यांच्या समवेत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके ,दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रपाटील- यड्रावकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी उपस्थित होते.
१० जानेवारीला तोडगा?
साखर कारखानदारांनी मुख्यमंत्र्यांकडे साखर कारखानदारीसमोरील अडचणी विशद करून राज्य सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ऊसाची एकपक्षीय एफआरपी देण्यासाठी साखर कारखानदारांना प्रतिटन ५०० रुपये कमी पडत आहेत. ही रक्कम शासनाने अनुदान म्हणून द्यावी. किंवा केंद्राकडे पाचशे रुपये वाढवून घेवून साखरदर प्रतिक्विंटल २९०० वरून ३४०० रुपये करण्यास भाग पाडावे, या मागणीचा त्यांनी आग्रह धरला. यावर फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्याच सोलापूर दौऱ्यावर येत असून, याबाबत मी त्यांना मदत करण्याची विनंती करेन. याप्रश्नी येत्या दहा तारखेपर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
त्यानंतर साखर कारखानदारांचे हे शिष्टमंडळ पालक मंत्री चंद्रकांत पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही भेटले. दरम्यान ,पंतप्रधानांच्या सोलापूर दौऱ्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सोलापुरात असल्यामुळे या शिष्टमंडळाला मुंबईत ते भेटू शकले नाहीत.
अन्यथा उसाचे गाळप बंद?
एकरकमी एफआरपी देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासननुसार राज्य सरकारने प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे अनुदान द्यावे . ते न दिल्यास किंवा केंद्रसरकारने साखरदर २९०० रुपयांवरून ३४०० रुपये केले नाहीत तर ११ जानेवारीला साखर कारखानदारांची बैठक होऊन त्यापुढे साखर कारखाने सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेणार घेतला जाणार असल्याचे आज कारखानदारांनी सांगितले.