भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी तीन तास बंदद्वार चर्चा केली. मात्र, चर्चेचा तपशील बाहेर सांगण्यास संघ आणि भाजप वर्तुळाने नकार दिला. मोदी जवळजवळ तीन तास नागपुरात होते.
मोदी येणार असल्यामुळे गेल्या ८ जुलैपासून अमरावती मुक्कामी असलेले सरसंघचालक काल रात्रीच नागपुरात परतले होते. मोदींचे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मोठय़ा संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी मोदी सुरक्षा व्यवस्था बाजूला ठेवून काही वेळ कार्यकर्त्यांसोबत चालले. विमानतळावरून मोदींची बुलेटप्रुफ आलिशान गाडी रक्षकांच्या ताफ्यासह संघ मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाली. सायंकाळी पावणेसात वाजता ते संघ मुख्यालयात पोहोचले.
मोदींच्या अडीच तासांच्या वास्तव्यात दोन्ही नेत्यांनी राजकीय विषयांवर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. या चर्चेच्या वेळी भाजपचे संघटन सचिव रामलाल, सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि सहसरकार्यवाह सुरेश सोनी उपस्थित असल्याची माहिती मिळाली. मोदी यांच्याशी बोलण्याच्या प्रतीक्षेत विमानतळावर आणि संघ मुख्यालयाबाहेर थांबलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मात्र निराशा झाली. रात्री सव्वानऊ वाजता मोदी बाहेर उपस्थित असलेल्या लोकांना हात दाखवत विमानतळाकडे रवाना झाले.

Story img Loader