केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक निकाल दिला आहे की धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल निर्णय देताना जे शेण खायचं आहे ते खाल्लंच आता सुप्रीम कोर्टावर आमची आशा आहे. जर अशाच प्रकारे देशात लोकशाहीची हत्या होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी?
आज आमचं धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव चोरट्यांनी चोरलं आहे. चोर मोठे झाले आहेत. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो देताना शेण खाल्लं जर असंच होणार असेल तर लोकशाहीची हत्याच होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून लोकशाहीला आदरांजली वहावी आणि आम्ही बेबंदशाही देशात सुरू करतो आहोत हे जाहीर करावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ७५ वर्षांचं स्वातंत्र्य आता संपलं आहे आणि आम्ही बेबंदशाही सुरू केली आहे हे मोदींनी जाहीर करावं.
न्याय यंत्रणाही आपल्या दबावाखाली येईल याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकारही त्यांना हवे आहेत. देशातल्या लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली आता भाजपाने आणि पंतप्रधानांनी वाहण्याचं धाडस दाखवावं. २१ तारखेपासून सर्वोच्च न्यायालयातही सलग सुनावणी सुरू होईल. तो निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये असं आम्ही म्हटलं आहे. उद्या कुणीही धनाढ्य माणूस उद्या एखादा पक्ष अशाच पद्धतीने पैशांच्या जोरावर विकत घेऊ शकतो.
चोराला राजमान्यता देणं हे काही लोकांना भूषण वाटत असेल पण राजमान्यता दिली तरी तो चोरच असतो. मी अनेकदा आव्हान दिलंं आहे की हिंमत असेल तर निवडणुका घ्या. पण ती हिंमत झालेली नाही. ज्या पद्धतीने भाजपाने मिंधे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलं आहे त्यावरून मला वाटतं आहे की निवडणूकही उद्या जाहीर करतील आणि मुंबई महापालिका जिंकून तिच्या हाती भिकेचा कटोरा देतील असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर आपल्या पूजेत धनुष्यबाण आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्याची पूजा केली आहे. तो धनुष्यबाण आणि त्याचं तेज हे माझ्याकडून कुणीही हिसकावू शकत नाही. कागदावरचा धनुष्यबाण आणि चिन्ह चोरांनी चोरलं असेल तरी हरकत नाही आम्ही या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत. तोपर्यंत आपली चोरी पचल्याचे पेढे चोरांना खाऊ द्या असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे.