कर्नाटकात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळून राज्यात सत्तेच्या खुर्चीत बसण्याचा बहुमान मिळवला आहे. या निकालामुळे भाजपाची चांगलीच पीछेहाट झाली असून आगामी काळात उत्तर प्रदेश आणि गुजरात वगळता भाजपाचे इतर राज्यातून उच्चाटन होईल, असं ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसंच, मोदींनी अपयशाचे खापर भाजपाचे राष्ट्रीय नेत्यावर फोडले असल्याचाही आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे.
कर्नाटकात खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटस
“उत्तर प्रदेश वगळता देशातील बहुतेक राज्यांतून भाजपचे उच्चाटन झाले आहे, ते लोकसभेतही होईल. उत्तर प्रदेशात भाजप जिंकलाच (ती शक्यता कमी) तर त्याचे श्रेय योगी महाराजांना जाईल व उत्तर प्रदेशचे भाजप खासदार विरोधी बाकांवर बसतील.त्यांच्या जोडीला फार तर गुजरात असेल, उत्तर प्रदेश व गुजरातच्या पलीकडचा भारत मोठा आहे व त्या भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या निकालाने दिलेला धडा आहे. कर्नाटकची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नाही! कर्नाटकात खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन लोटस’ झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरही तेच होईल”, असा विश्वास या अग्रलेखातून मांडण्यात आला आहे.
मोदींनी लोकांना भरकटवले
“काँग्रेस कर्नाटकात एकसंध होती. नेत्यांत मतभेद असले तरी त्यांनी ते निवडणुकीच्या दरम्यान उघड केले नाहीत. मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा ज्यांना होती असे डी. शिवकुमार, सिद्धरामय्या यांनी ‘हायकमांड’वर सर्वकाही सोपवून प्रचारात झोकून दिले. मुळात कर्नाटकातले भाजपचे बोम्मई सरकार भ्रष्टाचार व लुटमारीच्या प्रकरणात पूर्ण बदनाम झाले होते. शिवाय महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते व त्यावर न बोलता भाजपवाले व त्यांचे दिल्लीचे नेते हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून लोकांना भरकटवत राहिले”, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंबाबतची ती गोष्ट खटकली”, शंभूराज देसाईंनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांना…”
मोदींच्या रडण्यास भीक घातली नाही
“काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीची भाषा करताच मोदी वगैरेंनी ‘हा बजरंग बलीचा अपमान आहे,’ अशी बोंब ठोकून प्रचारात बजरंगबलीस उतरवले. काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे. मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करायला लावले. या सगळ्याचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे. भाजपचे नकली हिंदुत्व कर्नाटकात अजिबात चालले नाही. मोदी यांच्या नेहमीच्या रडगाण्यास भीक घातली नाही”, असंही यात म्हटलं आहे.
पराभवाचे मडके फोडण्यासाठी
“कर्नाटकचे चित्र कधी नव्हे इतके स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष तेथे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नदेखील आता पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपात नाही. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नड्डा यांना पराभवामागून पराभवाचे धक्के बसत आहेत व त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. कर्नाटकात भाजपने विजय मिळवला असता तर त्याचे श्रेय मोदी यांनीच घेतले असते, पण पराभवाचे मडके फोडण्यासाठी बिच्चारे नड्डा यांचे डोके आहे”, अशी खोचक टीकाही यामाध्यमातून करण्यात आली आहे.