पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडिया व डिजिटल इंडियाचे स्वप्न देशातील प्रवरेसारख्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थाच पूर्ण करू शकतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील डॉ. अब्दुल कलाम या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोकराव विखे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्ह्याचे पालकमंत्री राम िशदे आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, लोणीसारख्या खेडय़ात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कार्य प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने केले आहे. पद्मश्री विखे यांनी बिजारोपण केलेल्या या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे. बाळासाहेब विखे पाटील हे शाश्वत विकासाचे नाव आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव संस्थेला देताना आपल्यावर एक जबाबदारी येऊन पडते, कारण भारताला बलशाली राष्ट्र बनविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. जगातील युवकांची सर्वाधिक संख्या भारतात असल्याने या युवाशक्तीचे मानव संसाधनामध्ये परिवर्तन केले तर ते शक्य आहे, हे त्यांनी ओळखले होते. जगाला उत्पादित मालाला सर्वात जास्त गरज लागणार असून युवकांच्या ताकदीवर ती भारतच पूर्ण करू शकतो.
राधाकृष्ण विखे म्हणाले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी समाज उन्नतीचे काम केल्यामुळेच ग्रामीण भागात परिवर्तन झाले. राज्य सरकारने पद्मश्रींची जयंती शेतकरी दिन म्हणून साजरी केली. या ठिकाणी सुरू असलेले ग्रामीण परिवर्तन व विकासाचे काम राज्याला दिशादर्शक आहे.
डॉ. अशोकराव विखे यांनी प्रवरा रोल मॉडेलचे सादरीकरण यावेळी केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रेशनव्दारे धान्य मिळावे, कमवा व शिका योजनेची व्याप्ती वाढवावी आदी मागण्या त्यांनी केल्या.
संगमनेर, राहत्याची निवेदने
संगमनेरच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने संगमनेरला जिल्हा मुख्यालय व्हावे व राहाता वकील संघाने शिर्डी जिल्हा व्हावा या मागण्यांची निवेदने मुख्यमंत्र्यांना दिली.

Story img Loader