राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी दसऱ्यानिमित्त नागपूरमध्ये बोलताना आसाम आणि मिझोराममधील पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून नाराजी व्यक्त केलीय. “एकाच देशात आपल्याच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दसऱ्याच्या या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह इस्राईलचे वाणिज्यदूत कोब्बी शोशानी देखील हजर आहेत.

मोहन भागवत म्हणाले, “दोन्ही भारताचेच राज्यं असूनही त्या दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत? आपल्या राजकीय स्पर्धेतून आता सरकारांमध्येच विरोध होतोय. पक्षांचा विरोध असेल तर चालेल, पण सरकारी व्यवस्था तर एक आहे, संविधानानुसार ही व्यवस्था निर्माण झालीय. संविधानानुसार आपण संघराज्य आहोत.”

“सत्तेत बसलेल्या लोकांचंही वर्तन पोषक नसेल, तर मग समाजाला कोठून दिशा मिळेल?”

“आपण एक देशाचे लोक आहोत, आपल्या सर्वांचा एकच देश आहे. व्यवस्था संघराज्य आहे, लोक संघराज्य नाही. सर्व लोक एक आहेत, एक राष्ट्र आहेत. मात्र, असं पोषक वर्तन सत्तेत बसलेल्या लोकांचंही होताना दिसत नाही. मग समाजाला कुठून दिशा मिळेल? आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी असाच छळकपट सुरू असतो. त्यात समाजाच्या मनाचं काय होणार?” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : धर्मनिरपेक्षतेचं नाव पुढे करुन समाज तोडू नका-मोहन भागवत

“हे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष आहे. १५ ऑगस्ट १९४७ आपण स्वतंत्र झालो. आपण आपला देश पुढे नेण्यासाठी देशाची सूत्रं हाती घेतली. हे एका रात्रीतून मिळालेलं नाही. स्वतंत्र भारताचं चित्र कसं असावं हे भारताच्या परंपरेनुसार समान कल्पना मनात ठेऊन देशाच्या सर्व जातीवर्गातील वीरांनी तपस्या, त्याग आणि बलिदानाचे हिमालय उभे केले.”

“सर्व लोक हिंदू पुर्वजांचेच वंशज, सर्वांची मातृभूमी देखील भारतच”

मोहन भागवत म्हणाले, “भारत सर्वांचीच मातृभूमी आहे. भारत नेहमीच एक राष्ट्र राहिला आहे. सर्व विविधतांचा स्वीकार, सन्मान करण्यात येतो. आक्रमणकारी लोकांसोबत दोन धर्मसंस्कृती देशात आल्या. त्यांच्यासोबत आता कुणाचेच नाते नाही. सर्व लोक हिंदू पुर्वजांचेच वंशज आहे. त्यांची सर्वांची मातृभूमीदेखील भारतच आहे. काही लोकांनी फुटीरवादी भावना सोडण्याची गरज आहे. असे झाले तरच देशाची एकात्मता व अखंडता परत येईल. छोटे अहंकार विसरून सर्वांना आपले म्हणण्याची आवश्यकता.”

“सामर्थ्याचा उपयोग दुर्बलांच्या संरक्षणासाठी व्हावा. इतिहासाच्या घटनांना द्वेष निर्माण करण्यासाठी स्मरण करू नये. तो कमी व्हावा यासाठी स्मरण हवे,” असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

Story img Loader