सनातनसोबत कोणताही संबंध नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगितले जाते. तर सनातनकडून संघासोबत आमचे संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सनातन आणि रा. स्व. संघाच्या संबंधांवर आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावे. असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. सनातन संस्थेवर बंदी घाला आणि या संस्थेतील जयंत आठवलेला अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना विखे पाटिल यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘राज्यात भाजप आणि शिवसेनेला जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून त्यांनी केवळ भ्रष्टाचाराला साथ देण्याचे काम केले आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘ राज्यात भीषण परिस्थिती असून त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही भूमिका मांडत नाही.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच असल्याची मार्मिक टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, आधुनिक फडणवीस सुद्धा पेशवाईतील फडणविसांसारखेच पडद्यामागून सारी सूत्रे हलवतात. पण त्याचा सूत्रधार नेमका कोण, हे शेवटपर्यंत कळत नाही.

साहित्यिक व विचारवंतांच्या अटकेच्या समर्थनार्थ राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदा घेतल्या. या प्रकारावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची आणि पोलिसांची कानउघाडणी केली. तरीही या पत्रकार परिषदांबाबत मुख्यमंत्री मौन धारण करून बसले आहेत. त्यांचे हे मौनच ते या पत्रकार परिषदांचे मूळ आयोजक असल्याचे स्पष्ट करते, असा ठपकाही त्यांनी ठेवला.

आणखी वाचा : भाजपाने खड्ड्यात घालून ठेवलाय ‘महाराष्ट्र माझा’ : अशोक चव्हाण

‘केंद्रातील आणि राज्याच्या भाजप सरकारमध्ये शिवसेना गेल्या चार वर्षांपासून आहे. या चार वर्षाच्या कालावधी भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. त्या प्रत्येकवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडणार अशी घोषणा करण्याचे काम केले आहे. या चार वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या 235 घोषणा झाल्या असून लवकरच 250 घोषणा देखील पूर्ण होतील.’ अशा शब्दात विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाच्या सभेत ते बोलत होते.

कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन 31 ऑगस्टपासून कोल्हापूरपासून सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या भागात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रचा अखेरच्या टप्प्याची समारोप सभा आज पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर पार पडत आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरातयांच्यासह आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Story img Loader