Mohit Kamboj Threatens Gajabhau on X : भारतीय जनता पार्टीचे सदस्य व काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये व समाजमाध्यांवरील पोस्ट्समुळे असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत एका व्यक्तीला जाहीर धमकी दिली आहे. कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स हँडलला टॅग करून धमकी दिली आहे. कंबोज यांच्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. तसेच या पोस्टवर कमेंट्स करून अनेकांनी कंबोज यांच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे. तर, अनेक युजर्सने म्हटलं आहे की महायुतीला सत्ता मिळताच त्यांचे कार्यकर्ते लोकांना जाहीर धमक्या देऊ लागले आहेत. कंबोज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “माझं पुढील टार्गेट, गजाभाऊ… पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार! हर हर महादेव!”
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी कंबोज यांची जाहीर धमकी पाहून संताप व्यक्त केला आहे. दानवे यांनी म्हटलं आहे की “या असल्या कारभाऱ्यांनी भाजपाचे ‘कंभोजीकरण’ केलं आहे. तत्त्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘याला उचल, त्याला उचल’ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही… महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट गजाभाऊ”. कंबोज यांनी ज्या गजाभाऊ अकाउंटला टॅग करून धमकी दिली होती. त्याच अकाउंटला टॅग करून दानवे यांनी काळजी करू नका असं म्हटलं आहे.
हे ही वाचा >> बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत; खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय
कंबोज यांच्या धमकीनंतर अनेकजण गजाभाऊच्या समर्थनात प्रतिक्रिया देत आहेत. तर, भाजपा कार्यकर्त्यांनी कंबोज यांचं समर्थन केलं आहे.
हे ही वाचा >> ईव्हीएम हॅक करता येतं का? विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सांगितली मतमोजणीपर्यंतची सगळी प्रक्रिया
नेमका वाद काय?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गजाभाऊ व भाऊ गँग या दोन एक्स हँडल्सवरून सातत्याने उजव्या विचारसरणीविरोधात पोस्ट पाहायला मिळत होत्या. यादरम्यान, गजाभाऊ हँडलवरून महायुती, भाजपा, शिवसेनेच्या (शिंदे) कारभारावर बोट ठेवणाऱ्या प्रतिक्रिया येत होत्या. बऱ्याचदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्टदेखील पाहायला मिळाल्या होत्या. अनेक भाजपा कार्यकर्ते गजाभाऊच्या पोस्टवर कमेंट करून धमकी देताना दिसले होते. दरम्यान, आता कंबोज यांनी गजाभाऊ या एक्स हँडलला टॅग करत धमकी दिली आहे.