मुंबईतील क्रुझवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भाजपाशी संबधित असलेल्या मोहित कंबोज यांचा मेव्हणा ऋषभ सचदेवा याला एनसीबीनं ताब्यात घेतल होते. पण त्याला नंतर सोडून देण्यात आले. तर, मुंबईतील भाजपाच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून मी त्यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही कंबोज यांनी सांगितलं आहे.
मोहित कंबोज म्हणाले की, ”मी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही नाही. मी चैाकशीसाठी तयार आहे. माझ्यावर आरोप लावले की एनसीबीच्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे. पण माझ्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही आणि मी दीड वर्षांपासून राजकारणापासून अप्लित आहे. ऋषभ सचदेवा माझा मेव्हणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे? याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावे, आर्यन खान सोबत त्याची कधीही भेट झाली नाही. आम्ही एनसीबीच्या चैाकशीसाठी तयार आहोत. मात्र, नवाब मलिक यांन केलेल सर्व आरोप खोटे आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे.”
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवा याला सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मुंबईमधील भाजपाच्या युवा विभागाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या मेहुण्याचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे.